राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नाशिकने अहमदनगरला बरोबरीत रोखले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने सुरू झालेल्या आजच्या पहिल्या दिवशी मुंबई उपनगरने किशोरी गटात, तर रायगड, मुंबई शहर, अहमदनगर, पुणे यांची किशोर गटात विजयी सलामी. किशोरी गटात नाशिकने यजमान अहमदनगरला बरोबरीत रोखले.

अहमदनगर येथील रेसिडेंसियल हायस्कुलच्या पटांगणावर झालेल्या मुलींच्या फ गटात नाशिकने चुरशीच्या लढतीत अहमदनगरला 32-32 असे बरोबरीत रोखले. नगरच्या स्नेहा पवार, किरण पावरा यांनी झंजावाती खेळ करीत नाशिकवर दोन लोण देत पूर्वार्धात 25-06 अशी मोठी आघाडी घेतली. पण उत्तरार्धात ती त्यांना राखता आली नाही.

उत्तरार्धात नाशिकच्या खेळाडूंनी कमबॅक करीत या दोन लोणची परतफेड करीत ही आघाडी मोडून काढली. शेवटची चढाई नाशिकची होती व दोन गुणांची आघाडी नगरकडे होती. पण नाशिकच्या अक्षता धारणकरने आपल्या शेवटच्या चढाईत बोनस गुणासह एक गडी असे दोन गुण घेत संघाला बरोबरी साधून दिली. तिला या सामन्यात काजल शिंदे, भूमिका बच्छाव यांनी छान साथ दिली.

मुलींच्या अ गटात मुंबई उपनगरने सातार्‍याच्या 52-17 असा धुव्वा उडविला. मध्यांतराला 27-08 अशी आघाडी घेणार्‍या उपनगरने तोच जोश कायम राखत या सामन्यात गुणांचे अर्धशतक पार केले. हरजितकौर संधू, याशिका पुजारी या विजयात चमकल्या.

मुलांच्या फ गटात रायगडने उस्मानाबादला 37-11 असे नमविलें. पूर्वार्धात 16-08 अशी आघाडी घेणार्‍या रायगडने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. आकाश शिंदे, चंद्रकांत कयासे या विजयात चमकले. क गटात मुंबई शहराने पालघरला 49-34 असे पराभूत करीत विजयी सलामी दिली. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ 22-22 अशी बरोबरी होती. मध्यांतरानंतर मात्र करणं रावत, विराज तळेकर यांनी टॉप गिअर टाकत सामना सामना मुंबईच्या बाजूने झुकविला. ओम पाटील, ओंकार पाटील यांनी पालघरकडून कडवी लढत दिली.

याच गटात अहमदनगरने नाशिकला 42-13 असे नमविले. सार्थक शेकडे, संकेत खलाटेच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नाशिकचा साहिल कुटे बरा खेळला. फ गटात फ गटात पुण्याने लातूरला 46-32 असे नमविले खरे, पण त्याकरिता त्यांना विश्रांतीपर्यंत कडवी झुंज द्यावी लागली. पहिल्या जवळपास 18 मिनीटापर्यंत लातूरकडे आघाडी होती. पण पुण्याने लोण देत मध्यांतराला 21-20 अशी आघाडी मिळविण्यात यश मिळविले. यानंतर मात्र पुण्याने मागे वळून पाहिले नाही.

विशाल ताटे, विजय हेगडकर, राहुल कळसे यांच्या चढाई- पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. लातूरच्या प्रणय भातगिरे, बालाजी साळुंखे यांची लढत थोडी कमी पडली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post