दंडात्मक कारवाईचे टार्गेट २४ तासांच्या आत पूर्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महापालिकेच्या ८ स्वच्छता निरीक्षकांना प्रभारी आयुक्त असलेल्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले दंडात्मक कारवाईचे टार्गेट २४ तासांच्या आत पूर्ण केले. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी रात्रीपर्यंत प्लास्टिकबंदीसह कचरा व घाण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून किमान ८० हजारांच्या दंड वसुलीचे आदेश दिले होते; मात्र, स्वच्छता निरीक्षकांनी गुरुवारचा दिवस मावळण्याच्या आतच ९१ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करताना तब्बल ४९ जणांवर कारवाई केली व टार्गेट पूर्ण केले.
स्वच्छता अभियानात महापालिकेची कामगिरी सुधारण्याचे नियोजन द्विवेदी यांनी हाती घेतले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर प्लास्टिकविरोधी कारवाईची माहिती त्यांनी घेतली, तेव्हा अशी कारवाई अनेक दिवसांपासून बंदच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी आर. एल. सारसर, राजेंद्र सामल, पी. एस. बीडकर, बी. जे. विधाते, एस. ई. वाघ, ए. व्ही. हंस, के. के. देशमुख व टी. एन. भांगरे या ८ स्वच्छता निरीक्षकांना २४ तासांत ८० हजारांचा दंड वसुलीचे टार्गेट दिले. गुरुवारी दिवसभर शहर व उपनगरांतून फिरून प्रत्यक्षात या मंडळींनी ९१ हजार २५० रुपयांची दंड वसुली केली. प्लास्टिक जवळ बाळगल्याबद्दल प्रत्येकी ५ हजारांच्या दंडाची कारवाई १५ जणांवर करून ७५ हजारांचा दंड वसूल केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे वा घाण टाकल्याबद्दल १५० ते २ हजार ५०० रुपयांचा दंड ३४ जणांना करून १६ हजार २५० रुपये वसूल केले.
शहरभर मोहीम
प्लास्टिकबंदीची तसेच रस्त्यावर कचरा व अन्य घाण टाकणऱ्यांविरुद्धची कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी शहर व उपनगरांतून गुरुवारी दिवसभर मोहीम राबवली. सर्जेपुरा, तेलीखुंट, चितळे रस्ता, डाळमंडई, माळीवाडा, चांदणी चौक, मार्केट यार्ड, सक्कर चौक तसेच केडगाव सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात फिरून विविध दुकानांतील प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई केली. तसेच भाजीमंडई व अन्य ठिकाणी रस्त्यावर घाण टाकणाऱ्यांकडूनही दंड वसुली केली गेली. प्लास्टिकबंदीची कारवाई सोनी फॅशन्स, कार्तिक एजन्सी, कराचीवाला बेकर्स, उनाराम चौधरी, अप्पासाहेब पवार, महावीर छजलानी, सतीश खटोड, रामचंद खानचंद, लक्ष्मीनारायण किराणा, सिंध किराणा, मितेश लुंकड, सुराणा किराणा, संतोष गांधी, दत्त बेकर्स व रॉयल ज्युस या १५ व्यावसायिकांविरुद्ध करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजारांचा दंड वसूल केला गेला. ७५ हजारांच्या या दंड रकमेसह घाण टाकणाऱ्या ३४ जणांकडून कमीत कमी १५० रुपये तर जास्तीत जास्त अडीच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला गेला.
Post a Comment