कांद्याची लागवड विक्रमाच्या दिशेने



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - यंदा मुबलक पावसामुळे जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड विक्रमाच्या दिशेने आहे. गेल्या काही वर्षातील सर्वाधिक 95 हजार हेक्टरवर कांदा पिकांची यंदा लागवड झाली असून हे प्रमाण वाढणार असल्याचे कृषी क्षेत्रातील व्यक्तींचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या बागायत भागात कांदा लागवडीसाठी लागणार्‍या रोपाचे दर एकरी 30 ते 35 हजार रुपयांवर पोहचले असून लागवडीचे प्रमाण असेच राहिल्यास हे दर वाढणार आहेत. यासह एकरी लागवडीचा खर्च देखील सहा ते साडेसहा हजार रुपये एकर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून थंडीचे आव्हान पेलल्यानंतर कांद्याला किती दर मिळणार याची शाश्वती नसताना शेतकरी कांदा लागवड करताना दिसत आहेत.
बेभरवशाचे पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कांद्याकडे यंदा शेतकरी पुन्हा एकदा वळले आहेत.

सतत भाव पडतात म्हणून कांद्याऐवजी इतर पिकांना जास्त क्षेत्र देणार्‍या शेतकर्‍यांनी यावेळी कांदा लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यात तब्बल 95 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाली आहे. बाजार समितीत कांदा कमी प्रमाणात येत आहे. देशभरात कांद्याला मागणी वाढली आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारपेठेत कांद्याचे दर वाढण्यावर झाल्याचे दिसून येत आहे. येथे कांदा 120 ते 150 रुपये किलो दराने विक्री होत आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाचा यंदा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून, नवीन पीक पुरेशा प्रमाणात आलेले नाही. अशातच उन्हाळी कांद्याचा साठा संपत आला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे देशभरात कांद्याची मागणी वेगाने वाढत आहे. मात्र, मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कांद्याचे दर वाढत आहेत.

मुबलक पाऊस आणि सध्या लाल कांद्याला मिळणार्‍या दरामुळे शेतकरी मोठ्या संख्येने कांदा पिकाकडे वळाले आहेत. कांदा लागवडीचे प्रमाण वाढले असून यामुळे कांद्याच्या रोपांना मागणी वाढली आहे. त्यामुळे या रोपांचीही टंचाई जाणवत आहे. त्याचसोबत मजुरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा लागवडीसाठी शेतकर्‍यांना जास्त कसरत आणि खर्चही करावा लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जिल्ह्यात 95 हजार ते एक लाख हेक्टरवर कांदा लागवड केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षात हे प्रमाण खाली आले होते. मात्र, यंदा हा आकडा ओलांडून कांदा लागवड होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राहुरी, संगमनेर, नेवासा, पारनेर, श्रीगोंदे, कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.

सध्या लाल कांद्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे. या कांद्याचे उत्पादन अत्यल्प असल्याचे दिसत आहे. नगर तालुक्यात एका शेतकर्‍याला चार एकरमध्ये अवघे 10 गोणी कांदा उत्पादन झाले आहे. यामुळे कितीही भाव मिळाला तरी शेतकर्‍यांना कांदा उत्पादन परवडतेच असे नाही. यासह विक्रमी भाव मिळणार्‍या कांदा पिकाची आवक पाहिल्यास ती काही गोण्यांची असते. यामुळे कांदा पिकामुळे शेतकर्‍यांना मोठा नफा मिळतोय, हे चित्र रंगविणे चुकीचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post