अधिवेशनात स्थगितीचे ' ते ' मुद्दे गाजणार
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधी पक्षात बसलेल्या भाजपला तोंड देईल. अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा, कर्जमाफीचा मुद्दा तर गाजेलच, शिवाय आरेतील मेट्रो कारशेड तसेच इतर प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या भूमिकेवरही सरकारला बोलते केले जाणार आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले असले तरी सहा कॅबिनेट मंत्र्यांवर भिस्त ठेवून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला अधिवेशनाला सामोरे जावे लागणार आहे. पहिल्याच अधिवेशनात सरकारला घेरण्याऐवजी काही दिवस काम करू देण्याचे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आधीच जाहीर केले आहे. मात्र, शेतकरी मदत, कर्जमाफीचा मुद्दा आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने त्यांना देण्यात येणारी स्थगिती हे मुद्दे विरोधकांकडून रेटले जाणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने या दोन्ही नेत्यांकडून अधिवेशनावर पुरेपूर छाप पाडण्याचा प्रयत्न होईल.
Post a Comment