2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 135 कोटीच्या रक्कमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रक्कमेपैकी जवळपास 100 टक्के रक्कम 2 लाख 45 हजार 547 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान, मदतीचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाला असून आता शेतकर्‍यांसह जिल्हा प्रशासनाच्या नजरा सरकारकडून पाठविण्यात येणार्‍या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याकडे आहेत. मदतीचा दुसरा हप्ता सोमवारीच येणार असल्याचे संकेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, आता कशामुळे मदतीची प्रक्रिया लांबली हे कोणालाच सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

नगरसह राज्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नगर जिल्ह्यात 4 लाख 54 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांचे 449 कोटी रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारने या नुकसान भरपाईपोटी 135 कोटी रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या भरपाईच्या रक्कमेची जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या सुचनेनूसार मराठी अद्य अक्षरांप्रमाणे महसूल मंडल, गावे आणि शेतकर्‍यांच्या नावानुसार वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

सरकारने जिरायत आणि बागायत भागातील पिकांसाठी सरकट 8 हजार रुपये आणि फळबागांना 18 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदतीची रक्कम जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी आधी सरकट जिरायत आणि बागायत भागातील शेतकरी यांची निवड करून त्यांना भरपाई दिलेली आहे. यामुळे या तालुक्यातील फळबागा असणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पुढील टप्प्यात या शेतकर्‍यांना मदती देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मदत मिळालेले शेतकरी
नगर 17 हजार 654, अकोले 19 हजार 447, जामखेड 4 हजार 841, कर्जत 13 हजार 393, कोपरगाव 13 हजार 683, नेवासा 23 हजार 724, पारनेर 23 हजार 622, पाथर्डी 33 हजार 987, राहुरी 14 हजार 291, संगमनेर 24 हजार 498, शेवगाव 19 हजार 972, श्रीगोंदा 15 हजार 213, श्रीरामपूर 11 हजार 925 आणि राहाता 9 हजार 306 यांचा समावेश आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post