'स्विफ्ट' चोरणारे भामटे मुद्देमालासह जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शहरातील बोरुडेमळा या ठिकाणाहून स्विफ्ट कार चोरून नेणारे चोरटे पकडण्यात पोलिसांनी यश आले आहे. गणेश शिवाजी लोखंडे (वय 20, रा. लोंढेमळा, केडगाव, अ.नगर) व संकेत सुनिल खापरे (वय 21, रा. विनायकनगर, अ.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर शहरातील बोरुडेमळा येथील सिद्धविहार अपार्टमेंट इमारती शेजारी असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये पार्कींग केलेली स्विफ्ट कार (एमएच 20, एजी 6758) ही मित्र विजय प्रभाकर लटंगे (रा. सिडको औरंगाबाद) यांच्या मालकीची मुंबईला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शशिकांत शिवाजीराव देशमुख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व गाडीचा शोध घेतला असता, सुपा एमआयडीसी चौक, नगर-पुणे रोड येथून दोन इसम गुन्ह्यातील नमूद सिल्व्हर रंगाचे स्विफ्ट कारमधून नगर-पुणे रोडवरून एमआयडीसीकडे जात असताना दिसले. तातडीने कारला घेरावा घालून कारमधील गणेश लोखंडे व संकेत खापरे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून 50 हजार रुपये किंंमतीची सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार ही दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आली. मुद्देमालासह आरोपींना तोफखाना पोलिस ठाण्यात हजर केले. गणेश लोखंडे याच्यावर यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. सोन्याबापू नानेकर, पोेहेकॉ विजयकुमार वेठेकर, पोना रविंद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post