'योग-प्राणायमामुळे येणारी पिढी सशक्त, सक्षम होऊन भारत जगात सर्वश्रेष्ठ होईल'


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - बालकांपासून युवक व वयस्करांनीही दैनंदिन जीवन शैलीत योग प्राणायमाची सवय लावून घ्यावी. दैनंदिन योग प्राणायामामुळे मानसिक व अध्यात्मिक शक्ती वाढून मानसिक शांतीही लाभते; त्यामुळे योगाची सवय लागली तर अजीवन कोणत्याही व्याधी होणार नाहीत. शरीरातील सर्व नकारात्मक उर्जा बाहेर जावून आत्मबल वाढते. जगामध्ये अनेक देशांमध्ये मुलं शाळेत गेल्यावर देशसेवेसाठी सैनिकी शिक्षण सक्तीचे केले आहे. तसे आपल्या देशातही योगा प्राणायमाचे प्रशिक्षण लहानपणापासून सक्तीचे केले तर आपल्या देशाची येणारी पिढी ही सशक्त, सक्षम, पूर्ण निरोगी होऊन भारत जगात सर्वश्रेष्ठ होईल. यासाठी जन्माला आलेल्या बालकाला थोडेफार समजायला लागल्यानंतर योग प्राणायामाचे प्रशिक्षण द्यावे. आपल्या भारताची प्राचिन काळाची वैभवशाली परंपरा असलेल्या योग-प्राणायम कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने करावे. नगरच्या पतंजली योग समितीने भव्यदिव्य शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराला संत नागेबाबा मल्टीस्टेट परिवाराने बहुमोल सहकार्य केले आहे, याबद्दल कडूभाऊ काळे यांचे आभार, असे प्रतिपादन हरिद्वार येथील युवा संन्याशी योगगुरु आनंददेव महाराज यांनी केले.

नगरमध्ये पाईपलाईन रोडवरील जयबजरंग विद्यालयाच्या मैदानावर पतंजली योग समिती, नगर शाखेच्यावतीने संत नागेबाबा मल्टिस्टेटच्या सहकार्याने नि:शुल्क योग चिकित्सा, प्राणायाम, ध्यान-धारणा, विश्‍वशांतीलसाठी वैदीक यज्ञ शिबीराचे आयोजन करण्यात आले. रविवार दि.8 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या शिबीराचे उद्घाटन प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे, पतंजली समितीचे जिल्हा प्रभारी बाळासाहेब निमसे, जिल्हा संघटक मधुकर निकम आदिंसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी योगगुरु स्वामी आनंददेव महाराज यांचा जिरेटोप घालून नगर पतंजली परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. पहाटे पाच ते साडेसात वाजेपर्यंत चालणार्‍या या शिबीरात नगर शहर व उपनगरातील शेकडो नागरिक उत्फुर्तपणे सहभागी झाले आहेत.

योगगुरु आनंददेव महाराज यांनी शिबीरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना योगासने, विविध व्यायाम प्रकार, सर्व प्रकारचे प्राणायम आदिंची शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याबरोबरच विविध आजारांवर रामबाण उपाय ठरणार्‍या विविध जडीबुटींची माहितीही देत आहेत. याबरोबरच शिबीरस्थळी सायंकाळी 5 ते 6.30 यावेळेत योगगुरु आनंददेव महाराज श्रीमद् भागवत गितेचे प्रवचनही करत आहेत. योग व अध्यात्माची अनोखी सांगड असलेल्या या शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने पहाटेच्या योग प्राणायम शिबीरास व सायंकाळच्या प्रवचनास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कडूभाऊ काळे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post