महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला -भाजप




माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - महाराष्ट्र सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा ही उधारीची घोषणा असल्याची टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असे आश्वासन दिले होते. परंतु, माफ करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आम्ही आमची सत्ता असताना सरसकट माफी दिली होती. सरकार केवळ 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकित कर्ज माफ करणार असे सांगत आहे. सरकारने ही कर्जमाफी शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा पोहोचविणार याचे स्पष्टीकरण द्यावे असेही फडणवीस म्हणाले आहेत.


भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी अपुरी असल्याचे सांगत सभात्याग केला. यानंतर बाहेर येऊन पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "आमची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. 2017 ते 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपये माफ केले होते. त्यामध्ये केवळ सरकारी नोकर, आमदार आणि खासदारांनाच वगळण्यात आले होते. आता महाविकासआघाडी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार अशी घोषणा केली आहे. ही कर्जमाफी नेमकी कशी लागू होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आम्ही कर्जमाफी दिली त्यावेळी पीक कर्ज आणि शेती साहित्या खरेदी अशा सर्वच खर्चांचा विचार केला होता. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना फायदा कसा पोहोचविणार हे स्पष्ट करावे." यासोबतच, भाजपने कर्जमाफी देताना शेतकऱ्यांच्या कर्जांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये 1.5 लाख ते 2 लाख पर्यंतचे कर्ज माफ केले तर 8 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे समोर आले होते. आता या कर्जमाफीत कुणाला फायदा होणार सरकारने ते देखील सांगावे असे भाजप नेते म्हणाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post