नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात आज अहमदनगरमध्ये मोर्चा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने (शुक्रवार) दि. 27 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, प्रशासनाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या कडक पोलीस बंदोबस्तात सुमारे 100 एसआरपी, धुळे, जळगाव, नाशिक व अ.नगरच्या आरसीपींची 6 पथके, तसेच नगरचे पोलीस प्रशासन असा सुमारे 1 हजार ते 1200 पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा यासाठी तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

या मोर्चाच्या मार्गाची जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख सागर पाटील व शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांनी बारकाईने पाहणी करून सूचना केल्या. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक चांडक, कोतवालीचे पो.नि. विकास वाघ, तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. हारुण मुलानी, वाहतूक शाखेचे पो. नि. अविनाश मोरे आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुस्लिम मूक मोर्चा ज्या मार्गाने नेला जाणार आहे, त्या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच हिडन कॅमेरे मोर्चावर नजर ठेवण्यासाठी लावण्यात आले आहेत. याशिवाय मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेर्‍याद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. मूक मोर्चाचा भंग करणार्‍या व अनुचित प्रकार करणार्‍या समाज कंटकांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. अफवा पसरविण्याच्या विरोधात सोशल मीडियावर सायबर पोलीस टीम तैनात करण्यात आली आहे. या मोर्चासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, मोर्चेकर्‍यांनी शांततेने यावे व शांततेत मूक मोर्चा काढावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोर्चेकर्‍यांसाठी पार्किंगची व्यवस्था हुंडेकरी लॉन, कोठला परिसरात आदी ठिकाणी करण्यात आली असून, मोर्चेकर्‍यांनी आपले वाहन या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे. शहरात कुठलेही ट्रॅफिक जाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. या मूक मोर्चात सुमारे 100 साध्या वेशातील पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. मोर्चावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याची माहिती कोतवालीचे पो.नि. विकास वाघ यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post