'या' कारणासाठी शास्त्रज्ञ उतरले रस्त्यावर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -
नगर दौंड रस्त्यावरील व्हीआरडीई समोरून जाणा-या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे रोजच अपघात होत होते. व्हीआरडीईमध्ये काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांसह रस्त्यावरून ये-जा करणा-या सर्वांनाच त्रास होत होता. या त्रासातून मुक्त होण्यासाठी व्हीआरडीईच्या निदेशकांसह वरिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचा-यांनी रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी श्रमदान करत या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने बुजवले. व्हीआरडीईच्या वर्धापनदिनाच्या पुर्वसंध्येला अधिका-यांच्या या श्रमदानाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
मागील एक वर्षांपासून नगर-दौंड रस्त्याचे काम सुरु आहे. या काळात प्रवाशांसह वाहनांचे प्रचंड नुकसान होत आहे. सध्याही काहीठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम केल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. व्हीआरडीई समोरच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे रोजच अपघात होतात. या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान होऊन निष्पाप लोक जखमी होत आहेत. व्हीआरडीईचे अधिकारी, वैज्ञानिक तसेच कर्मचारीही या रस्त्यावरून ये-जा करत असतात. खराब रस्त्याचा त्यांनाही फटका बसला आहे. व्हीआरडीईचे अधिकारी व शास्त्रज्ञही या रोजच्या त्रासाला कंटाळले होते.
व्हीआरडीईचा वर्धापनदिन 3 डिसेंबरला आहे. त्या पार्श्वभुमीवर व्हीआरडीईचे निदेशक संगम सिन्हा यांच्यासह वैज्ञानिकजी एम. डब्लू त्रिकांडे, वरिष्ठ अधिकारी डी राधाकृष्णऩ, जी. आर. एम राव, कार्यसमिती उपाध्यक्ष विठ्ठल वायकर यांच्यासह सुमारे अडीचशे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक व कर्मचा-यांनी या रस्त्यावर श्रमदान करण्याचा निश्चय केला. आशिया खंडात व्हीआरडीईला फार मोठे स्थान आहे. देशाची सुरक्षा, वाहनसंशोधन तसेच अतिशय क्लिष्ट अशा संशोधनाच्या कामात मग्न असलेले सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आज रविवारी सुटीच्या दिवशी भल्या सकाळीच तोंडाला मास्क लावून हातात घमेले, खोरे घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी साखळी करून मुरुमाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ थेट रस्त्यावर उतरून काम करत असल्याचे पाहून प्रवाशीही आचंबित झाले होते. सर्व शास्त्रज्ञ व अधिका-यांनी आज दुपार पर्यंत न थकता काम करत या रस्त्यावरील खड्डे बुजवले.
मागील आठवड्यातच या रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाल्यामुळे निष्पाप लोक जखमी झाले होते. रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्हीआरडीईमधील अधिका-यांनी व्यक्त केली. वरिष्ठ अधिका—यांच्या या श्रमदानाचे परिसरातील नागरीकांनी कौतूक केले आहे.
Post a Comment