जेऊर परिसरात बिबट्याचे दर्शन ; वनविभागाकडुन तरस असल्याचा दावा


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, बिबट्या आल्याच्या चर्चेनंतर वनविभागाच्या वतीने खोसपुरी परिसरात ठसे घेण्यात आले असुन ते ठसे तरसाचे असल्याची माहिती वनपाल एस.आर. बडदे व वनरक्षक पी.एस. ऊबाळे यांनी दिली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, ईमामपूर येथील चिमणा डोंगर परिसरात शेतकऱ्यांना मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. इमामपूर येथील शेतकरी ते तरच नसून बिबट्याच असल्याचे ठामपणे सांगत आहेत. त्यातील एक बिबट्या जखमी असल्याने लंगडत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान याच दिवशी जेऊर येथिल नाईक मळा परिसरात नागरिकांनी तरस पाहिले आहे. ईमामपुर येथे पाहिलेले बिबटेच आहेत कि तरस याबाबत नागरिकांमध्ये संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. बिबट्याच्या चर्चेने शेतकरी रात्रीच्या वेळेस पिकाला पाणी देण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत.

यापुर्वी देखील जेऊर परिसरात बिबट्याचा अनेक वेळा वावर दिसुन आलेला आहे. तसेच ईमामपुर येथिल मिनीनाथ आवारे या तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जखमी देखील केले होते. तसेच घाटात अपघातात एक बिबट्याचा मृत्यु देखील झाला होता. तर बहिरवाडी येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात यश मिळविले होते. या घटनांवरुन परिसरात बिबट्या असल्याबाबतच्या चर्चेवर नागरिक विश्वास ठेवत आहेत.

बिबट्याच्या भितीने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असुन वनविभागाच्या वतीने ईमामपुर परिसरात ठसे घेऊन बिबट्या कि तरस याचा खुलासा करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post