'या' भागातील नागरिक भोगतायेत नरकयातना
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- ड्रेनेज लाईन ठिकठिकाणी चोकअप होऊन रस्त्यावर वाहत असलेले दुर्गंधीयुक्त घाणपाणी, जागोजागी ओपन स्पेसमध्ये तयार झालेले घाण पाण्याचे डबके आणि त्यामुळे सर्वत्र पसरलेली घाण, दुर्गंधी आणि डासांचा वाढता उपद्रव यामुळे नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील हजारो नागरिक सध्या नरकयातना सहन करत आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन महापालिका प्रशासनाचे मात्र त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
नगर-कल्याण रस्त्यावर शिवाजीनगर परिसर हा मोठ्या लोकवस्तीचा परिसर झाला आहे. या भागात हजारो नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु या भागात नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शिवाजीनगर परिसरात नगर-कल्याण रस्त्यालगत असलेली ड्रेनेज लाईन मागील 15 दिवसांपासुन ठिकठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळे ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. सदर पाणी जागोजागी असणार्या ओपन स्पेसमध्ये साठत असल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके झाले आहेत. या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने चालताना प्रत्येकाला नाक दाबुन चालावे लागत आहे. त्यातच सर्वत्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचे तीन – तेरा वाजले असून डासांचा मोठा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे.
डास आणि घाणीमुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाजीनगर परिसरातील सुमारे दहा हजार नागरिकांची लोकवस्ती ड्रेनेजलाईन, घाण पाणी, अस्वच्छता आणि डासांमुळे त्रस्त झाली आहे. नागरिक नरक यातना सहन करीत असताना महापालिका प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी मात्र त्याबाबत कोणतीही दखल घेताना दिसत नाही. मागील 15 दिवसात मनपाचा एकही अधिकारी या परिसराकडे फिरकलेला नाही. ड्रेनेज लाईन कुठे लिकेज आहे, त्यामुळे नागरिकांना कोणत्या अडचणी, समस्या भेडसावत आहेत, हे पाहणे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असताना अधिकार्यांनी मात्र त्याकडे डोळे झाक केल्याने नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Post a Comment