भारताचा 'विराट' विजय


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई : बहरलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरी आणि अंतिम टी-ट्वेन्टी ६७ धावांनी जिंकली. तसेच मालिकेत २-१ अशी बाजी मारली. आणखी एका मालिका जेतेपदासह विराट कोहली आणि सहका-यांनी घरच्या मैदानावर वर्चस्व राखले.

वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताचा विजय पूर्वार्धातच निश्चित झाला होता. पाहुण्यांकडून ‘जशास तसा’ खेळ अपेक्षित होता. मात्र यजमानांचे २४१ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ८ बाद १७३ धावा करता आल्या. मधल्या फळीत कर्णधार कीरॉन पोलार्डसह (६८ धावा) तिस-या क्रमांकावरील शिमरॉन हेटमीयरने (४१) थोडा प्रतिकार केला तरी आघाडी फळी कोसळल्याने पाहुण्यांना अपेक्षित चुरस देता आली नाही.

भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (४१-२) आणि दीपक चहर (२०-२) या मध्यमगती दुकलीने सुरुवातीला अचूक मारा केला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही (२५-२) नियंत्रित गोलंदाजी केली. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने (४५-२) विकेट घेतल्या तरी तो महागडा ठरला.

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी म्हणत प्रचलित आहे. मात्र सलामीवीर रोहित शर्मा (३६ चेंडूंत ७१ धावा) आणि लोकेश राहुलसह (५६ चेंडूंत ९१ धावा) तसेच कर्णधार विराट कोहली (२९ चेंडूंत नाबाद ७० धावा) या त्रिकुटाच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २४० धावा अशी मोठी धावसंख्या उभारली. रोहित आणि राहुलने वैयक्तिक खेळ उंचवतानाच ११.४ षटकांतील १३५ धावांची झटपट सलामी यजमानांच्या मोठय़ा धावसंख्येचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. पहिल्या दोन सामन्यांत मिळून २३ धावा करणारा रोहितला घरच्या मैदानावर सूर गवसला. ‘मुंबईकर’ फलंदाजाने १९वे अर्धशतक झळकावताना ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७१ धावा फटकावल्या. राहुलने फॉर्म मिळवताना आठवे अर्धशतक ठोकले. त्याच्या ५६ चेंडूंमधील ९१ धावांच्या सवरेत्कृष्ट खेळीत ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. ‘वनडाऊन’ बढती मिळालेल्या रिषभ पंतने (०) निराशा केली तरी रोहित आणि राहुलच्या दमदार पायाभरणीवर विराट कोहलीने कळस चढवला. यजमान कर्णधाराने २४वे टी-ट्वेन्टी अर्धशतक ठोकताना अवघ्या २९ चेंडूंत ७० धावांची नाबाद खेळी केली. विराटने ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. कोहली आणि राहुलने चौथ्या विकेटसाठी केलेली ९५ धावांची भागीदारी भारताच्या डावातील दुसरी सर्वाधिक भागीदारी ठरली.

बहरलेल्या आघाडी फळीमुळे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धूळधाण उडाली. वेगवान गोलंदाज जेसन होल्डरसह (५४-०) खॅरी पिएर (३५-०), कीरॉन पोलार्ड (३३-१) तसेच शेल्डन कॉट्रेलने (४०-१) प्रत्येक षटकामागे दहाहून अधिक धावा मोजल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post