मेट्रोला स्थगिती नाही, मात्र कारशेडला स्थगिती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - उद्धव ठाकरेंनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार देखील स्वीकारला. यावेळी विधीमंडळ वार्ताहार संघातर्फे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. विधीमंडळ वार्ताहारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. दरम्यान मी मुख्यमंत्री म्हणून येईन असे सांगितले नव्हते म्हणत उद्धव यांनी फडणवीसांना चिमटा काढला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी कधीच असे काही प्रयत्न केले नाही. माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. ती मी स्वीकारली. मोठी आव्हानं पाहून मी पळालो नाही. पळालो असतो मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून घेण्यास पात्र ठरलो नसतो.
मी याआधी 2-3 वेळा काही ना काही लोकांची कामे घेऊन आलो. मी मुख्यमंत्री आहे यावर आताही मला विश्वास बसत नाही. काहींनी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला तर मी इकडेतिकडे पाहात होतो. फक्त झोडपणे म्हणजे पत्रकारिता नाही. ज्याच्यावर टीका केली त्याला त्याच्या चुका कळायला हव्यात, असे काम व्हायला हवे.

प्रथा, माहीत नाही तरी शिवधनुष्य उचलले आहे. सरकारने जनतेशी नम्रपणे वागायला हवे. जनतेचा पैसा योग्य पद्धतीने वापरला जावा. जनतेच्या एकही पैशाची उधळपट्टी होणार याची काळजी हे सरकार घेईन. पत्रकार सरकारचे कान, नाक आणि डोळे व्हा. सरकार केवळ घोषणा करते, मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी झाली आहे का, त्याचा फायदा नागरिकांना झाला आहे का याची माहिती पत्रकारांकडून मिळायला हवी.

रस्त्यावर अनेक पोस्टरदिसतात त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे फोटो दिसतात. मात्र, त्यावर खर्च करायचा नाही. हा मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री असेल. त्यामुळे माझ्या मुंबईसाठी काय करायचं हे मी ठरवेल. सोबतच शेतकऱ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post