'शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या अहंकारी भाजपाला मोठी किंमत मोजावी लागेल'
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांचा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला. महाराष्ट्र राज्य कोणा समोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले. भाजपाने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे, त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी दिला आहे. आता राज्यात शेतकर्यांचे राज्य आले आहे, आज शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले आहे. असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर शहरामध्ये शिवसेनेच्यावतीने जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उप महापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, शिवाजी कदम, प्रशांत गायकवाड, अनिल लोखंडे, हभप भाकरे महाराज, संजय सागांवकर, बाली शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबादास पंधाडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जन्मभुमीमध्ये हिऱ्यांची निर्मिती होते. महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला खुप मोठे नेते दिले, पण नेहेमीच दिल्लीवाल्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशिल राज्य आहे. या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या महाराष्ट्रावर कोणीही अन्याय करु नये. महाराष्ट्र हे स्वाभीमानी राज्य आहे. कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही ते म्हणाले. भाजपाने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे, त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही पंधाडे यांनी दिला.
Post a Comment