रब्बीचा हंगाम लांबणार
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नोव्हेंबर महिन्यांच्या तोंडावर 1 लाख 96 हजार क्षेत्रावर असणार्या रब्बी हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आहे. गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यात अवघ्या 9 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या असून अनेक भागात शेतात पावसाच्या पाण्याने वापसा नसल्याने पेरणीची आकडेवारी पुढे सरकत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यंदा पेरणीस विलंब होणार असल्याने रब्बी हंगाम देखील लांबणार आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यांच्या सुरूवातीच्या काही दिवसांपर्यंत पाऊस पडत होता. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या सोंगणीसह रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, ज्या ठिकाणी पेरण्या शक्य होत्या अशा 1 लाख 96 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावासाने उघडीप दिल्याने आता शेतीच्या कामाला वेग आला आहे. खरीप हंगामातील पिकांची सोंगणी करून त्यानंतर लगेच रब्बी हंंगामासाठी शेतीच्या मशागतीला सुरूवात करण्यात आली आहे. अद्याप अनेक ठिकाणी शेतात वापसा नसल्याने शेतकर्यांची पंचाईत झाली आहे.
आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात 1 लाख 91 हजार हेक्टवर ज्वारी पिकाची पेरणी झाली असून थंडीचे आगमन झाल्यामुळे आता गव्हाच्या पेरणीला सुरूवात झाली असली तरी तिचा वगे कमी आहे. आतापर्यंत 506 हेक्टवर पेरणी झाली असून यंदा गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. लष्करी अळीचा खरीप हंगामात प्रार्दूभाव झाल्यानंतर देखील जिल्ह्यात रब्बी हंगामात 2 हजार 711 हेक्टवर मका पिकाची पेरणी झालेली आहे. हरभरा पिकाची 10 हजार 408 हेक्टरवर पेरणी झाली असून ऊसाची लागवड 21 हजार हेक्टवर झालेली आहे. कांदा पिकाच्या लागवडीचे क्षेत्र 30 हजार हेक्टरपर्यंत पोहचले आहे.
असे आहे नुकसान
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 1 लाख 60 हजार हेक्टरवर बाजरी पिकाची पेरणी झाली होती. मात्र, अतिरिक्त पावसाने बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले असून कणसाला कोंब आले असून काळपट बुरशीची लागण झालेली आहे. लष्करी अळीमुळे मका पिकाच्या उत्पादनात 35 टक्के घट येणार आहे. तूर पिकावर देखील अळीचा प्रादुर्भाव झालेला असून भुईमूग पिकावर मावा व फुलकिडे या किडीचा परिणाम झाला आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात 40 टक्के घट येणार आहे. सर्वात मोठा फटका कपाशी पिकाला बसण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
Post a Comment