आ. जगताप- राठोड मनोमिलनाचा प्रयत्न ? विनायक देशमुख यांचा समन्वयाचा दावा



माय नगर वेब टीम
अहमदनगर - बदलत्या राजकीय परिस्थितीत नगर शहराच्या विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. अशी भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी रविवारी विद्यमान आमदार संग्राम जगताप व माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडली. शहराच्या विकासाबाबत आजी-माजी आमदारांमध्ये एकवाक्यता असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

देशमुख यांनी आधी शिवसेनेच्या शिवालयात जाऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर माजी आ. अनिल राठोड यांच्याशी शहराचे प्रलंबीत प्रश्न व शहरातील राजकीय स्थिती याबाबत चर्चा केली. दुपारी माजी महापौर दीपक सूळ यांच्या कार्यालयात देशमुख यांनी आ. संग्राम जगताप यांची भेट घेऊन चर्चा केली. आगामी 5 वर्षे राजकारण दूर ठेवून शहरातील रस्त्यांची भिषण अवस्था या विषयाला प्राधान्य देण्याबाबत व एकत्रित काम करण्याबाबत भूमिका मांडली.

राज्य स्तरावर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांचे नेते एकत्र काम करताना दिसत आहेत. यामुळे नगर शहराच्या विकासासाठी आ. संग्राम जगताप व माजी आ. राठोड यांच्या समन्वय करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यात यश येईल, असा दावा देशमुख यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post