महाआघाडीचे शक्तिप्रदर्शन; ‘आम्ही १६२ म्हणत दिली शपथ’
माय नगर वेब टीम
मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांचे शक्तीप्रदर्शन केल आहे. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या 162 आमदारांची परेड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते. त्यामुळे हॉटेल ग्रँड हयातमध्ये मिनी विधानसभाच भरल्याचे एकंदरीत चित्र दिसत होते. या तिन्ही पक्षांनी केलेली आमदारांची ही परेड हा राज्यपालांवरील दबावतंत्राचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार असे वाटत असताना राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने राज्याच्या राजकारणला एक आगळी वेगळीच राजकीय कलाटणी दिली आहे.
या अनपेक्षित घटनेनंतर राज्यातील घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा खंबीरपणे पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत.
तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून मंगळवारी सकाळी १०.३० वाजता निर्णय देण्यात येणार आहे.
Post a Comment