उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी पदभार न स्वीकारताच दिला राजीनामा



माय नगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादीचे बंडखोर अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील एकूणच घडामोडी बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उद्या (दि.27) सायंकाळी पाच वाजेपर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करावयाचे आहे. त्याआधीच राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते आणि बंडखोर अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने भाजपचा पाय अधिक खोलात गेला आहे.

आज सकाळी अजित पवार यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार बंधू श्री निवास पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यानंतर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला.

तसेच आज सकाळी २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांसोबत आलेले नव्हते. अजित पवार गटातील आमदार भाजपच्या गोटातून सोडविण्यात राष्ट्रवादीला यश आल्यामुळे अजित पवार गोत्यात सापडले होते. उद्या सायंकाळी बहुमताचा आकडा कसा पूर्ण होणार या विवंचनेत अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे.

तसेच मुख्युमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद बोलावली असून यामध्ये ते राजीनामा देण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दिल्ली तसेच मुंबईत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असलेले राष्ट्रवादीचे आमदार शोधण्यात शिवसेना, राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसच्या पदाधीकारांना यश आल्यामुळे सर्व आमदार सुखरूप राष्ट्रवादीच्या गोटात परत आले त्यामुळे अजित पवार एकटे पडले होते. याला शरद पवार यशस्वी खेळी म्हणता येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post