माय नगर वेब टीम
संगमनेर - भारत संचार निगमने ऐच्छिक सेवानिवृत्ती घोषित केल्यानंतर देशभरातील सुमारे 80 हजार कर्मचार्यांना भारत संचार निगम निरोप देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातही सुमारे 60 टक्के कर्मचारी या योजनेत सहभागी झाले असून कर्मचारी बाहेर पडल्यानंतर बीएसएनएलच्या सेवेचे काय होणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
एकेकाळी देशातील दूरसंचार सेवेत आपला पगडा कायम ठेवणार्या भारत संचार निगमची अवस्था वाईट झाली आहे. मोठ्या प्रमाणावर तोटा वाढत चालला आहे. भारत सरकारने कंपनीला हात देण्याची गरज असताना हात दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्थानाची आशा कमी झाली आहे. एकीकडे खासगी कंपन्यांशी मोठ्या प्रमाणावर करावी लागणारी स्पर्धा आणि दुसरीकडे सरकारी असणारे निर्बंध यामुळे कंपनी दिवसेंदिवस तोट्यात चालली आहे.
भारत सरकारने कंपनीस हात देण्याचे सुतोवाच केले होते. मात्र कंपनीला आधार मिळू शकला नाही. त्यामुळे कंपनी प्रशासनाने कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत देशभरातील 80 हजार कर्मचार्यांची यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली. ही यादी म्हणजे ऐच्छिक सेवानिवृत्त होण्यासाठी पात्र असलेल्या कर्मचारी व अधिकार्यांची होती. यापैकी जे अधिकारी सेवानिवृत्त होऊ इच्छितात त्यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये आणखी पात्र असलेल्या बहुसंख्य कर्मचारी अधिकार्यांनी पसंती दर्शक अर्ज सादर केले होते. फार कमी प्रमाणात नकार देणारे कर्मचारी, अधिकारी आता उरले आहेत. येत्या आर्थिक वर्षात कंपनीला रामराम ठोकणार्या कर्मचार्यांची संख्या सुमारे 80 हजारांच्या आसपास असणार आहे.
व्यवहार्य भूमिकेची गरज
भारत संचार निगम कंपनी आपल्या सुविधा पुरविताना अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या आहे. तेथे सुविधा पुरविण्याची गरज आहे. मात्र ग्राहकांची संख्या कमी आहे. तिथे आधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च होऊन कंपनीला तोटा होत असल्याचे एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. अहमदनगर जिल्ह्याच्या जवळ असलेल्या बीडमध्ये फोर जी सुविधा निर्मिती करण्यात आली असून, अहमदनगर जिल्ह्यात मात्र अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे खासगी कंपन्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे. यात सुविधा अधिक ग्राहक कमी असलेल्या क्षेत्रात कंपनीने मात्र विचार न करता सुविधा दिल्याने कंपनीचा तोटा वाढत चालला आहे. सरकारी धोरण राबविण्याचा आग्रह केला जातो. मात्र यातून होणारा तोटा कंपनीच्या मस्तकी मारून कंपनी तोट्यात असल्याचे दाखवले जाते.
संगमनेर कार्यालयात उरणार फक्त तीन कर्मचारी
भारत संचार निगम कंपनीने ऐच्छिक सेवानिवृत्तीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर कर्मचार्यांनी वार्याच्या वेगाने प्रस्ताव सादर केले आहेत. संगमनेर कार्यालयात कार्यरत असलेल्या सुमारे 25 कर्मचार्यांपैकी 22 कर्मचारी व अधिकार्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. येथील सेवा सुविधा केंद्र, नियंत्रण अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी असे 22 अधिकारी हे या योजनेअंतर्गत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांपैकी फक्त तीन कर्मचारी रहाणार असल्याने भविष्यात काय होणार आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खर्चात बचतीसाठी उपाय सुरू
निर्माण केलेल्या साधन सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च होत आहे. कंपनीकडे असलेला निधी मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने, खर्चात काटकसर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून कंपनीच्या कार्यालयाजवळ उभ्या केलेल्या अधिक पॉवरच्या विद्युत सुविधांमध्ये कपात करून कमी पॉवरच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तर लागणारे डिझेल मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. स्थानिक अधिकार्यांच्या पातळीवर आपली पत वापरून डिझेल मिळवण्याचा प्रयत्न कर्मचारी करत आहेत. मात्र पेट्रोल पंप चालकांना वेळेत पैसे मिळत नसल्याने या अधिकारी व कर्मचार्यांनाही पैशाचा तगादा सुरू झालेला असल्याचे सांगण्यात आले.
नगरमध्ये 375 कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीसाठी अर्ज दाखल
अहमदनगर जिल्ह्यात भारत संचार निगम कंपनीचे सुमारे साडेपाचशे कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी सुमारे पावणे चारशे कर्मचार्यांनी कालपर्यंत सेवानिवृत्तीसाठी अर्ज सादर केले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण सुमारे 60 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने अवघ्या 40 टक्के कर्मचार्यांवर कंपनीचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे सेवेचा बोजवारा वाजण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या कर्मचार्यांची संख्या लक्षात घेता सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाल्यावर दूरध्वनी सेवेचे काय होणार याचा अंदाज न केलेला बरा.
Post a Comment