नेत्यांचे झाले.. कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार का ?





माय नगर वेब टीम
अहमदनगर – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाशिवआघाडी सरकार स्थापन्यासंदर्भात बैठकांचा सपाटा सुरू आहे. किमान समान कार्यक्रमही निश्‍चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वेगवेगळ्या विचारधारा असलेले तिन्ही पक्ष भाजपाला बाजूला ठेवून एकत्र येत आहेत. असे महाआघाडीचे सरकार स्थापन केल्यास गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार्‍या पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे खर्‍या अर्थाने मनोमिलन होणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

किमान समान मुद्याच्या आधारावर शेतकरी हिताचा अजेंडा घेऊन या तीनही पक्षांचे महाशिवआघाडी सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. अजेंडा ठरविण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. बैठकांची माहिती नेत्यांच्या वक्तव्यात एकवाक्यता दिसत आहे. तिनही पक्षांचे नेते पाच वर्षे सरकार टिकेल. आमच्यात मतभेद नाहीत असेही सांगत आहेत. पण ती तीनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खर्‍या अर्थाने सामंजस्याची भूमिका राहील का? हा प्रश्‍न पडला आहे.
आगामी काळात स्थानिक संस्था आणि सहकारातील निवडणुकांसाठी हे तिनही पक्ष एकत्र राहणार की परस्परांच्या विरोधात लढणार?

हाही प्रश्‍न विचारला जावू लागला आहे. मात्र तळागाळातील या तिनही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनासाठी अनेक ठिकाणी मानसिक ओढाताण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अहमदनगरचा यापूर्वीचा इतिहास पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष झालेला आहे. विधानसभा असो की मनपा निवडणूक असो त्यात या पक्षांतच लढती रंगलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने संघर्ष राहिलेला आहे. त्यातून अनेकदा तणावाचे वातावरणही झाले आहे. गत मनपा निवडणुकीतही शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असताना भाजपा आणि राष्ट्रवादीने गळ्यात गळा घातल्याने शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात या कार्यकर्त्यांत कितपत मनोमिलन होते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
पारनेरातही अशीच स्थिती आहे. शिवसेनेचे विजय औटी यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातत्याने विजय मिळविला आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. त्यामुळे येथेही कार्यकर्त्यांत ऐक्य होऊ शकते की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अकोलेत यापूर्वी ज्येष्ठनेते मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांचे वर्चस्व राहिलेले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. लहामटे विजयी झाले आहेत. तसे ते पूर्वी शिवसेनेतच होते. शिवसेना अगस्ति साखर कारखान्यात सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे आगामी काळात येथील गणितं कशी राहतात हे पाहणे गरजेचे आहे.
संगमनेरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लढा दिला आहे. पण आता बदलू पाहत असलेल्या गणितात येथीलही कशी समीकरणे बदलतात याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहेत.
श्रीरामपूरात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. पक्षांतरं झाली. त्यामुळे पुढे पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण जोरात आहे. काँग्रेसकडून लहू कानडे निवडून आलेले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंचा पराभूत केला आहे. ससाणे गटाने कांबळेंविरोधात प्रचारयंत्रणा राबविली. तसेच राष्ट्रवादीत असलेला आदिक गट ससाणे गटाविरोधात आहे. निवडणुकीत मुरकुटेंचाही कांँग्रेसच्या लहू कानडेंना विरोध करून शिवसेनेच्या कांबळेंना ताकद दिली. या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात येथील कार्यकर्त्यार्ंंची मनं जूळतील की नाही यावरच चर्चा झडू लागली आहे.
कोपरगावात शिवसेनेचा एक गट कोल्हेंबरोबर आहे. येथे राष्ट्रवादीकडून आशुतोश काळे विजयी झालेले आहेत. त्याचवेळी राजेश परजणे काँग्रेसमध्ये आहेत. अशावेळी येथेही स्थानिक कार्यकर्त्यांची गोची होणार आहे.

तुझ्या गळा..माझ्या गळा..!
सहकारी संस्था, पालिका, झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायती निवडणुकांच्यावेळी प्रत्येक आपापले वर्चस्व आबाधित ठेवताना संबंधीत पक्षांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची अडचण होऊ शकते.
काही ठिकाणी आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांचे गळ्यात गळे घातल्याचे चित्र आगामी काळात पहायला मिळू शकते.
सत्तेचा फॉम्युला ठरवताना शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या नेते जसे सामज्यंस्य दाखवत आहेत. अशाच प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होण्यासाठी नियमावली अथवा सामजस्यांचा नवा फॉम्युला बनविण्यात यावा असा विचारही पुढे येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post