माय नगर वेब टीम
मुंबई - आगामी 'दबंग 3' या चित्रपटातील अभिनेता सुदीप किच्चाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चित्रपटात चुलबुल पांडे ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सलमान खानने हे पोस्टर त्याच्या ट्वीटर या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करुन सलमानने त्याच्या खास शैलीत लिहिले, "विलेन जितना बड़ा हो, उससे भिड़ने में उतना ही मजा आता है। पेश हैं 'दबंग 3' में बाली के रोल में किच्चा सुदीप।" पोस्टरवर सुदीप सुटबुटात दिसतोय. तर त्याच्या चेह-यावरचे रागीट भाव लक्ष वेधून घेत आहेत. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आगीचे दृश्य दिसत आहे.
रविवार (6 ऑक्टोबर) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. याची माहिती सलमानने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन दिली होती. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या बर्थ अनिव्हर्सरीच्या दिवशीच शूटिंग पूर्ण झाल्याने सलमानने या व्हिडिओतून त्यांना आदरांजली वाहिली होती. विनोद खन्ना आणि सलमान खान यांनी ‘दबंग’, ‘दबंग 2’ आणि वॉन्टेड या चित्रपटांत एकत्र काम केले होते. ‘दबंग’ चित्रपटात विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता ‘दबंग 3’ चित्रपटात विनोद यांचे भाऊ प्रमोद खन्ना हे त्यांच्या जागेवर दिसणार आहेत.
‘दबंग 3’चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 20 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment