मुंबई - अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दरात सलग पाचव्यांदा कपात केली. पतधोरण समितीच्या आढावा बैठकीत रेपो दर ०.२५ टक्के घटवून ५.१५% केला आहे. यापूर्वी हे दर ५.४० टक्के होते. दहा वर्षांत प्रथमच रेपो दर इतके कमी झाले आहेत.
रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्के करण्यात आला आहे, तर बँक दर ५.४० टक्के झाला आहे. विशेष म्हणजे, सरकारी बँकांनाही कर्ज आणि बचतीच्या व्याजदरांत ०.२५ टक्के कपात करावी लागेल. कारण सरकारने एक ऑक्टोबरपासून हे व्याजदर रेपो दराशी संलग्न केले आहेत.
नव्या कर्जधारकांना याचा तत्काळ लाभ मिळेल. मात्र जुन्या कर्जधारकांना एक जानेवारीनंतर दिलासा मिळेल. यापूर्वी बँका त्यांच्या सोयीनुसार दरांत कपात करत असत, त्यामुळे ग्राहकांना रेपो दर कपातीचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या आढावा बैठकीतही १५ मूळ अंकांच्या कपातीची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
Post a Comment