मतरूपी पावसाचा कौल कुणाला, आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट
माय नगर वेब टीम
अहमदनगर – विधानसभेसाठी मतदान पार पडले असून नगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांतील निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. काही मतदारसंघांत मतांची टक्केवारी घटली आहे. तर काही मतदारसंघांत टक्केवारी काहीशी वाढली आहे. परंतु, आता या मतदारसंघांतील 216 उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निकालाची धाकधूक सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे मतदान कमी झालेल्या मतदारसंघात कोणत्या भागात मतदान कमी झाले याचीही चर्चा होऊ लागली असून त्याचा फटका कोणाला बसणार यावरही उहापोह सुरू आहे. तर कुठे यावेळेस चमत्कार घडणार, उद्याच्या वृत्तपत्रांची हेडलाईन काय असेल, पुन्हा प्रस्थापितच बाजी मारणार की, त्यांना धक्के बसणार आदींवर दिवसभर खलबते सुरू होती. या सर्वांचे उत्तर आज गुरुवारी दुपारपर्यंत सर्वांना मिळणार आहे.
शिर्डीतून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे चुलतबंधू सुरेश थोरात यांना उमेदवारी देऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. शिर्डीकरांना सुरेश थोरात नवखे असल्याने ना. विखे यांचा विजय मताधिक्याने होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे येथे मताधिक्याचीच चर्चा झडत आहे.
संगमनेरात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी सातवेळा त्यांनी विजयाचा झेंडा फडकवला. अलीकडच्या निवडणुकांमध्ये त्यांच्यावर संगमनेरकरांनी विश्वास टाकून विक्रमी मताधिक्य दिले. आताही त्यांच्याच विजयाचा झेंडा फडकेल असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. यावेळी विखेंनी शिवसेनेचे साहेबराव नवले यांच्यामागे ताकद उभी करून विविध अस्त्रांचा वापर केला. त्यामुळे थोरातांचे मताधिक्य कमी होणार असल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कुठे मताधिक्य वाढणार आणि कुठे कमी होणार याची चर्चा झडत आहे.
श्रीरामपूरचे राजकारण ‘काळी पिवळी गाडी’ सारखे झालेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या नी पक्षांत्तराला ऊत आला. त्यातून श्रीरामपूरच्या प्रमुख उमेदवारांचे चेहरे तेच आहेत. केवळ चिन्ह बदलले. त्यात विखे-थोरात गटाच्या वादात अनेक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली. श्रीरामपूर शहर, बेलापूर, टाकळीभान गट आणि देवळालीच्या गावांत मतदारांनी शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे की काँग्रेसचे लहू कानडे यांना कसा कौल दिला यावर येथील विजयाचे गणित जुळणार आहे.
राहुरीत अटीतटीची लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाचे शिवाजीराव कर्डिले पुन्हा निवडणूक रिंगणार उतरले आहेत. त्यामुळे भाजपाकडून आमदारकीची हट्ट्रिक साधणार की मतदार त्यांना विधानसभेच्या मैदानाबाहेर घालवून राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंना बॅटींगची संधी देणार याबाबत उत्सुकता आहे.
कोपरगावात भाजपाकडून स्नेहलताताई कोल्हे निवडणूक लढवित आहेत. तेथे राष्ट्रवादीकडून लढणार्या आशुतोष काळे यांनी आव्हान उभे केले. त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. त्यात राजेश परजणे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे कुणाची किती मतं घेतात यावर येथील निकाल फिरणार आहे.
नेवाशात भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यापुढे क्रांतिकारीचे शंकरराव गडाख यांनी सर्व अस्त्रांचा वापर करत रंगत आणली. गेल्यावेळीच्या चुका होणार नाहीत याची काळजी घेत गावंगाव त्यांनी पिंजून काढले. सोनई, कुकाणा, भेंडा, नेवासा शहर, बेलपिंपळगाव परिसरात कोण किती मतदान घेतो यावरच ‘बॅट’ चमकणार की पुन्हा कमळ फुलणार याचीच चर्चा सुरू आहे.
अकोलेत पिचड पिता-पुत्रांनी भाजपात प्रवेश करून निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात बहुतेक विरोधक एकवटले. त्यामुळे मतदार पुन्हा वैभव पिचड यांना संधी देतात की, विरोधकांचे स्वप्न डॉ. किरण लहामटेंच्या रूपाने साकार होते याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
कर्जत – जामखेड विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू रोहित यांनी लढविल्याने दोन्ही बाजूने ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. कर्जतमध्ये रोहित पवार यांना तर जामखेडमध्ये राम शिंदेंचा मताधिक्य रहाण्याचा अंदाज समर्थकांनी केला आहे. त्यामुळे कुणाला किती मताधिक्य मतदारांनी दिले यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. कर्जतमध्येतर निकालाआधीच रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लागला आहे. त्यामुळे या ‘बिग फाईट’ मध्ये खरचं ते विजयी होणार का याची चर्चा झडू लागली आहे.
नगर शहरात शिवसेनेचे अनिलभैया राठोड आणि राष्ट्रवादीकडून संग्रामभैय्या जगताप यांच्यातच गतवेळीप्रमाणे लढत आहे. पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे यंदा कोणत्या ‘भैय्या’ला मतदार पसंती देतात याकडे नगरकरांच्या नजरा आहेत.
श्रीगोंद्यात भाजपाचे बबनराव पाचपुतेंनी या निवडणुकीत सावध खेळी केली. त्यांच्या व्युहरचनेचात्यांच्या व्युहरचनेचा त्यांना लाभ होणार आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे घनशाम शेलार आहेत.
पारनेरात शिवसेनेचे विजय औटी पुन्हा बाजी मारणार की राष्ट्रवादीचे उमलते नेतृत्व नीलेश लंके यांना मतदार पसंती देणार याचा उलगडा आज होणार आहे.
शेवगाव-पाथर्डीत भाजपाच्या मोनिकाताई राजळे यांना मतदार पुन्हा संधी देणार की आमदारकीचे स्वप्न पाहणार्या अॅड. प्रताप ढाकणेंना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Post a Comment