‘नगर शहर’ मध्ये 1 लाख 68 हजार 804 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क




माय नगर वेब टीम
अहमदनगर- विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात 69.43 टक्के मतदान झाले असून नगर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 58.28 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान नेवासा मतदारसंघात 80.07 टक्के नोंदले गेले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.21) जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात सुरळीत व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मात्र मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला. त्याचा परिणाम मतदानात यावेळी घट नोंदली गेली आहे.

नगर शहर मतदारसंघात एकूण 58.28 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील एकूण 2 लाख 89 हजार 629 मतदारांपैकी एक लाख 68 हजार 804 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात 91 हजार 680 पुरुष तर 77 हजार 100 महिलांचा समावेश असून अन्य 24 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी शहरात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. मागील निवडणुकीत 1 लाख 65 हजार 934 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी मतदारसंख्येत वाढ होऊनही 1 लाख 68 हजार 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे प्रमुख चार पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे मागीलवेळी मतदानाची टक्केवारी वाढली असल्याची पुष्टी जोडण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी नेवासा मतदारसंघात विक्रमी 80.07 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर अकोले 68.20 टक्के, संगमनेर 71.72 टक्के, शिर्डी 70.67 टक्के, कोपरगाव 76.23 टक्के, श्रीरामपूर 63.93, शेवगाव 65.65 टक्के, राहूरी 68.37 टक्के, पारनेर 70.23 टक्के, श्रीगोंदे 67.66 टक्के, कर्जत-जामखेड 73.98 टक्के मतदान झाले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post