पुणे - राज्यभरात आघाडीच्या प्रत्येक नेत्याच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या सभांदरम्यान नागरिक भाजप आणि शिवसेनेच्या कारभाराबद्दल जाहीरपणे बोलत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आघाडीला 175 जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या प्रचाररॅली दरम्यान ते बोलत होते.
पवार म्हणाले की, भाजपने ५ रुपयात तर शिवसेनेने १० रूपयात जेवणाची थाळी, एक रुपयात आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासने दिली आहेत. पण पाच वर्ष सत्ता असताना तुम्ही झोपा काढल्या का? असा सवाल पवारांनी यावेळी काढला. निवडणुकीत भाजपकडून ३७० या राष्ट्रीय मुद्दयावर चर्चा घडवून आणली जात आहे. त्यापेक्षा राज्यातील प्रश्नावर त्यांनी बोलण्याची गरज आहे. मात्र ते काहीही बोलत नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असलेल्या त्या ठिकाणापासून काही अंतरावर एका तरुण शेतकऱ्याने भाजपचा टी-शर्ट घालून आत्महत्या केली . पण ही मोठी घटना घडली असताना, मुख्यमंत्री त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले नाही, अशी टीका पवार यांनी केली.
Post a Comment