माय नगर वेब टीम
पुुणे- विधानसभा निवडणुकीत राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेना सरकारवर निशाणा साधला. एवढंच नाही तर अभी तो मै जवान हूँ म्हणत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. राधानगरी भुदरगड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची मुदाळ येथे सायंकाळी प्रचार सभा झाली. या सभेत शरद पवार बोलत होते.
विधानसभा निवडणुकीला रंग चढू लागला असताना जिल्ह्याच्या या पहिल्या दौऱ्यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीकेची तोफ डागली . विधानसभा , लोकसभा , राज्यसभा अशा सलग १४ निवडणुका मी जिंकल्या , त्यामुळे आता मी निवडणुकीला उभे राहत नाही हे स्पष्ट करून पवार म्हणाले , महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य होते. मात्र जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा राज्य चुकीच्या मार्गावर नेण्याचं काम सरकारनं केलं. हे सरकार मार्गावर आणण्यासाठी पुन्हा एकदा सत्ता आघाडीचे राज्य आणले पाहिजे. ते आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
महापुरात लोकांचे प्रश्न सोडवण्याचा हे सरकार कमी पडले असाही आरोप शरद पवार यांनी केला. आपत्तीच्या काळात लोकांमध्ये अस्वस्थता असते. त्यांना धीर द्यायचा असतो . लातूरचा भूकंप , २००५ मध्ये आलेला महापूर या काळात त्याचा प्रत्यय आम्ही आणून दिला होता . मात्र मागील महिन्यात झालेल्या महापुराचं आव्हान पेलण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले . लोकांना वाऱ्यावर सोडल्याने हेच लोक सरकार उलथवून टाकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असताना सत्ताधाऱ्यांना झोप येतेच कशी? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Post a Comment