व्हाटस्‌ऍप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी उभारले ग्रामदेवीचे मंदिर



माय नगर वेब टीम
अहमदनगर - व्हॉटस्‌ऍप, फेसबुक या सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या कामासाठी करत तरुणांनी गावातील ग्रामदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करीत या माध्यमातून लोकवर्गणी जमा करत सुमारे 15 लाख रुपये खर्चुन ग्रामदेवीचे भव्यदिव्य मंदिर उभारले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी दिवाळी पाडव्याला मंदिर उभारणीचा शुभारंभ करत नवरात्रोत्सवापुर्वीच मंदिराची उभारणी करत मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.

नगर तालुक्यातील सारोळा कासार गावातील ध्येयवेड्या तरुणांनी केलेला संकल्प सिद्धीस नेला आहे. सारोळा गावाजवळ एक छोटीशी टेकडी आहे. टेकडीवर पुर्वी छोटेसे मंदिर होते, ते मंदिर टेम्भीमातेचे असल्याचे जुने लोक सांगत होते. गावातील काही तरुण दररोज सकाळी या टेकडीवर व्यायामासाठी जायचे, छोटेसे मंदिर पाहून त्यांना या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना सुचली. या संकल्पनेला मुहूर्तरुप देण्यासाठी आणि आर्थिक मदत जमा करण्यासाठी त्यांनी टेम्भी माता मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन केली. व्हॉटस्‌ऍपवर त्या नावाचा ग्रुपही तयार केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून व फेसबुकद्वारे मंदिर जीर्णोद्धारासाठी गावकर्‍यांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले. मागीलवर्षी दिवाळी पाडव्याला कामाचा नारळ फोडण्यात आला आणि पुढील नवरात्रोत्सवापुर्वी मंदिराचे काम पुर्ण करण्याचा संकल्प केला. सुमारे 9 महिने सातत्याने लोकवर्गणी जमा करत काम सुरु ठेवले आणि मागील महिन्यात मंदिराचे काम पुर्ण झाले. या कामासाठी गावातील ग्रामस्थांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली. तसेच काहींनी विटा, वाळू, सिमेंट, खडी या वस्तुरुपातही मदत केली. त्यामुळे काम पुर्णत्वास जाऊन 11 सप्टेंबरला या मंदिराचे कलशारोहण करण्यात आले आहे. जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात यावर्षी प्रथमच नवरात्रोत्सव साजरा केला जात असून दररोज सकाळी आणि सायंकाळी देवीची आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (दि.8) विजयादशमीच्या निमित्ताने या ठिकाणी होमहवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वृक्षारोपण करुन संपुर्ण टेकडी करणार हिरवीगार
मंदिर जीर्णोद्धाराचे काम पुर्ण केल्यानंतर आता या समितीने संपुर्ण टेकडी वृक्षारोपण करुन हिरवीगार करण्याचा संकल्प केला आहे. टेकडीवर आतापर्यंत सुमारे 150 वृक्षांचे रोपण केले आहे. अजूनही वृक्षलागवड केली जाणार आहे. पावसाळ्यानंतर या वृक्षांची जोपासणा करण्यासाठी टेकडीवर 25 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीतून ठिबक सिंचनाद्वारे लागवड केलेल्या वृक्षांना पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
या समितीत ऐश्वर्य मैड, जगन्नाथ ढोरजकर, विलास कडूस, दिपक धामणे, डॉ.अतुल संचेती, सुरेश धामणे, सुनील काळे, अमोल चौधरी, सचिन शिंगाडे, जीवन हारदे, चंद्रकांत कडूस आदींचा समावेश असून त्यांना सर्व गावकरी यथाशक्ती मदत करत आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे ग्रामदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post