नगरमध्ये नव्या पर्वाचा उदय


माय नगर वेब टीम
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीतील दोन्ही जागा गमावल्यानंतर मधल्या काळात उतरती कळा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही विधानसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात पुन्हा महत्त्व वाढणार आहे. रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीला नवा नेता मिळाला आहे. त्यांच्याकडून मतदारसंघासोबतच आता जिल्ह्यातही पक्षाचे काम वाढविण्याच्या अपेक्षा आहेत, तर भाजप-सेनेला फटका बसलेल्या भागात काँग्रेसलाही नवी जुळवाजुळव करून पुन्हा उभारी घेण्याची संधी आहे. कर्जत जामखेड बरोबर नगर जिल्ह्यात आमदार रोहित पवार कशा पद्धतीने जिल्ह्यात पक्षाची बांधणी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ मिळणार आहे.



राष्ट्वादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पवारांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे सिद्ध होते.

राष्ट्रवादी पक्षाला आलेली उभारी कायम ठेवून पुन्हा संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न आता सुरू होतील. पूर्वी पक्षात आपसांत कुरबुरी होत होत्या. बहुतांश नेते केवळ पक्षाध्यक्ष शरद पवार आल्यानंतरच एकत्र येत असत. त्या काळात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समर्थक सुप्त गटही अस्तित्वात होता. आता मात्र रोहित यांचा संपर्क वाढणार आहे. त्यांचे नेतृत्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनाही मान्य करावे लागणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले, त्यातील चौघे युवा आहेत. उरलेलेही तसेच तरुणच आहेत. एकाच वयोगटातील असल्याने रोहित यांच्यासोबत त्यांचे सूर अधिक चांगल्या पद्धतीने जुळून संघटना बांधणीसाठीही त्याचा फायदा होईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते मानतात.


दरम्यान, राष्ट्रवादीमुळे तयार झालेल्या वातावरणाचा काँग्रेसलाही फायदा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही आता पक्ष संघटनेची फेरबांधणी करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे दिसते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना थेट निवडणुकीलाच सामोरे जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यातही पक्षाच्या विस्तारासाठी त्यांना वेळ मिळाला नव्हता. आता राज्यभरात मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे थोरात यांचेही महत्त्व वाढले आहे. त्याचा त्यांना नगर जिल्ह्यातही फायदा होणार आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतच त्यांना जिल्ह्यात काम करावे लागणार आहे. त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राधाकृष्ण विखे यांच्याशी संघर्ष करण्यासाठीही त्यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळू शकते. पक्षीय पातळीवर मात्र जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठीच्या संघर्षात विखे-थोरात यांच्यासोबत आता पवार यांचीही भर पडली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post