चेतन नवलानी यांनी पटकावला आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन किताब


शहरवासीयांच्या वतीने आ. संग्राम जगताप यांनी केला नवलानी यांचा सत्कार

माय नगर वेब टीम

अहमदनगर : नगरमधील गोपाल स्टोअर चे संचालक चंद्रभान ब्रिजलाल नवलानी यांचे नातू आणि व्हिजन अकॅडमीचे संचालक चेतन नवलानी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या आयर्नमॅन 70.3 गोवा हि स्पर्धा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. शारीरीक व मानसिक शक्तीची कसोटी पाहणारी हि स्पर्धा जागतिक स्तरावरावरील अतिशय खडतर स्पर्धा मानली जाते. नवलानी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे नगर जिल्ह्यातील पहिलेच शिक्षक ठरले आहेत. महाराष्ट्रातील सिंधी समाजातूनही ते पहिलेच आयर्नमॅन ठरले आहेत. या यशाबद्दल आ. संग्राम जगताप यांनी नवलानी यांचा नगर शहराच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

आयर्नमॅन 70.3 या स्पर्धेत स्पर्धकाला जलतरण, सायकलिंग आणि रनिंग या क्रीडा प्रकारात कामगिरी करावी लागते. यात 1.9 किलोमीटर जलतरण, 90 कि.मी.सायकलिंग, 21 कि.मी.रनिंग अशा तीनही गोष्टी 8 तास 30 मिनिटात पूर्ण करण्याचे आव्हान असते. फिटनेस व इच्छाशक्तीच्या जोरावर नवलानी यांनी हि स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची कामगिरी करून नगरचे नाव रोशन केले आहे. नवलानी यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक उत्तुंग कामगिरीची नोंद या आधीही केली आहे. सायकलिंगमध्ये 200 कि.मी.च्या 4, 300 कि.मी.च्या 2 व 100 कि.मी.च्या 5 राईड त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. 21 किलोमीटरच्या 5 मॅरेथॉनही पूर्ण करण्याची कामगिरी त्यांनी केलेली आहे. औरंगाबादमध्ये ड्युथेलॉन स्पर्धाही त्यांनी पूर्ण केली होती.

यावेळी बोलताना आ. जगताप म्हणाले की, आयुष्यात प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे. आजच्या काळात अभ्यासाइतकेच महत्त्व फिटनेसलाही आहे. खेळांमध्ये नैपुण्य मिळवताना सांघिक भावना, जिद्द, कणखरता प्राप्त होते. त्याचा उपयोग प्रत्येकाला दैनंदिन आयुष्यात नक्कीच होतो. आयर्नमॅन स्पर्धा नवलानी यांनी 7 तास 36 मिनीटात पूर्ण केली. आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल या उद्देशने नवलानी यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी दीपक नवलानी, विकी नवलानी, सिद्धार्थ शेलार, सागर शिंदे, विकी वाघ आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post