आ. गडाख यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली! ; शिवसेनेला दिला पाठिंबा
माय नगर वेब टीम
नेवासा : शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी पाडव्यानिमित्त माजी खासदार यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख यांची सोनई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता आमदार शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आमदार गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आलेले आहेत. ते कुठल्या पक्षात जातील या कडे संपूर्ण नेवासा तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आज सोमवार २८ ऑक्टोंबर रोजी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीसाठी आल्यानंतर कुटुंबीयांसोबत काढलेला फोटो आणि आमदार शंकराव गडाख यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या सोबत माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचे काढलेले जुने फोटो व्हायरल केल्याने आणि कार्यकर्त्यांनी फेसबुक व व्हाट्सऍप वर स्टेटसला ठेवल्याने दुपारनंतर नेवासा तालुक्यात शंकरराव गडाख हे शिवसेनेत दाखल झाल्याची चर्चा सुरू होती.
त्यामुळे आता कुठल्या पक्षात जातील या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान सायंकाळनंतर आ.गडाख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले.तर गडाख यांचे कार्यकर्ते एकमेकांना जय महाराष्ट्र करतांना दिसत होते.
गडाख यांनी पाठिंबा दिल्याने आतापर्यंत शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची संख्या पाच झाली असून या अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहचलंय.
पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार
शंकरराव गडाख यांनी यावेळी पाच वर्ष शिवसेनेसोबत राहणार असल्याचं सांगितलं. सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पत्र उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचं गडाख यांनी सांगितलं. निवडणुकीनंतर अनेक पक्षांनी आपल्याशी संपर्क साधला होता. मात्र ग्रामीण भागातील प्रश्न सत्ताधाऱ्यांसोबत राहूनच सोडवता येत असल्याने मी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसोबत राहून शेती आणि बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचं गडाख यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शंकरराव गडाख यांनी नेवासामधून क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. ही निवडणूक लढवताना त्यांनी भविष्यात गरज पडल्यास सत्ताधाऱ्यांना साथ देणार असल्याचं गडाख यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबाही दिला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडाख यांच्यासाठी प्रचारही केला होता. मात्र निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी गडाख यांनी वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Post a Comment