एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
माय नगर वेब टीम
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे. विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी परिपत्रक जारी करत म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळं होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी केवळ ८ जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनीही प्रकाश आंबेडकरांसोबत ५ सप्टेंबर रोजी पुण्यात अनेक बैठका केल्या. मात्र प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसी यांना ईमेल पाठवून ८ जागांची ऑफर दिली. मात्र एमआयएमने २०१४ विधानसभा निवडणुकीत २४ जागा लढवल्या होत्या. यामध्ये आम्हाला दोन जागांवर विजय मिळाला. नऊ ठिकाणी एमआयएम दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर होती. सध्या पक्षाचे विविध जाती-जमातीचे जवळपास १५० नगरसेवक आहेत. जिथे एमआयएमचे आमदार आहेत, त्या जागाही आंबेडकरांनी सोडल्या नाहीत, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
Post a Comment