शहर स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासनाकडून केवळ नौटंकी!; 'या' नगरसेवकांचा आरोप


माय नगर वेब टीम
अहमदनगर- स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात महापालिकेच्यावतीने स्वच्छता सर्व्हेक्षण 2019 च्या अनुषंगाने केली जात असलेली कामे हा केवळ दिखावा असून खोटी माहिती देवून महापालिका प्रशासन शासनाची फसवणूक करत असल्याचा आरोप नगरसेवक विनित पाऊलबुधे, आसिफ सुलतान व माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केला आहे.

स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेत अधिकारी कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि.24) सामुहिक शपथ घेवून स्वच्छता अभियान राबविले होते. तसेच महापालिका कार्यालयातील भिंतींवर स्वच्छतासंदर्भातील विविध घोषवाक्ये व चित्रे रंगविण्याचे काम सुरु आहे. शहरातही अनेक ठिकाणी केवळ भिंती रंगविल्या जात आहेत प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेचे कामकाज होत नाही. महापालिका कार्यालयाच्या प्रत्येक कोपर्‍यात, खिडक्यांमध्ये पान-तंबाखु खाऊन पिचकार्‍या मारलेल्या दिसून येत आहेत. स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनिय आहे. महापालिकेचे कार्यालयच अस्वच्छतेच्या गर्तेत असताना तसेच शहरात अनेक भागात घंटागाड्या वेळेवर जात नाहीत, कचर्‍याचे ढीग उचलले जात नाहीत, काही भागात दैनंदिन स्वच्छताही होत नाही असे असताना केवळ भिंती रंगविण्याचे नाटक सुरु आहे असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

महापालिकेने खोटी प्रसिद्धी करण्यापेक्षा नागरिकांना अगोदर चांगल्या सुविधा द्याव्यात त्यानंतरच पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. चुकीची माहिती देवून शासनाची दिशाभूल व फसवणूक करु नये अन्यथा स्वच्छता सर्वेक्षणासाठी येणार्‍या समितीसमोर महापालिका प्रशासनाचा बुरखा फाडू तसेच खोटी माहिती देवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही निखिल वारे, विनित पाऊलबुधे व आसिफ सुलतान यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post