अण्णा म्हणाले, शरद पवारांचे नाव नसताना आले कसे? 'त्या' अधिकाऱ्यांची चौकशी करा


माय नगर वेब टीम
पारनेर - राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली.
अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आले असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.
माझ्याकडे असलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नाही हे सत्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करणे चुकीचे आहे. जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अकडवण्यात येऊ नये. उलट माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही यावेळी हजारे यांनी केली.
शिखर बँकेने सहकारी कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयांची कर्जे दिली. मात्र, कारखान्यांनी ही कर्जे बँकेला परत केली नाहीत. त्यामुळे बँकेनी संबंधीत कारखान्यांवर जप्ती आणत ते कवडीमोल भावाने विकले. ही संशयास्पद बाब असून कारखाने जाणीवपूर्वक आजारी पाडले गेले असावेत अशी मला शंका आहे. सीआयडीनेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत यात कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे या गैरव्यवहारात अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचीही शंका असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना आपण पत्र पाठवणार असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post