पालकमंत्री अडचणीत! ; आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
माय नगर वेब टीम
कर्जत - कर्जत तालुक्यातील मिरजगावचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परमवीर पांडुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कर्जत - जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांना हा मोठा धक्का असेल. दरम्यान राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी पालकमंत्री प्रा.शिंदे यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून अनेक जण भाजपमध्ये जात असताना कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात उलटे चित्र आहे. येथे भाजप सोडून अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. नुकतचे जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड व उपसभापती राजश्री मोरे तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, राशिन भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शिवकुमार सायकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. मतदारसंघात भाजपमधील ही आऊट गोइंग थांबण्यास तयार नाही. काही दिवसांत आणखी धक्के भाजपला बसणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते.
मागील विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिरजगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपला चांगली मते मिळाली होती. या गटावर पालकमंत्री राम शिंदे यांची मोठी मदार आहे, असे असताना येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परमवीर पांडुळे त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Post a Comment