अबब ! ४० जनावरे पकडण्याचा खर्च तब्बल ३ लाख


मनपाच्या कोंडवाडा विभागाची अनागोंदी नगरसेवकांनी केली उघड

माय नगर वेब टीम
अहमदनगर- कर्मचार्‍यांच्या हजेरी रजिस्टरवर उपस्थिती २९ दिवस, प्रत्यक्ष काम अवघे ६ दिवस, शहरात पकडलेली मोकाट जनावरे ४० आणि यावर खर्च झाल्याचे दाखविले तब्बल ३ लाख रुपये. म्हणजे १ जनावरं पकडण्यासाठी खर्च केला ७ हजार ५०० रुपये. ही महापालिकेच्या कोंडवाडा विभागाची अनागोंदी नगरसेवकांनी आयुक्तांसमोरच शुक्रवारी (दि.२७) दुपारी उघड केली त्यामुळे सर्वच चकित झाले. या अनागोंदीची चौकशी करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले आहे.

शहरासह उपनगरात मोकाट जनावरांचा तसेच भटक्या कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट, कचर्‍याचा निर्माण झालेल्या प्रश्‍नासंदर्भात नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, अविनाश घुले, विनित पाऊलबुधे, प्रकाश भागानगरे, सुनिल त्रिंबके, मनोज कोतकर, डॉ.सागर बोरुडे, निखिल वारे, संजय चोपडा, बाळासाहेब पवार, अजय चितळे, मुजाहिद कुरेशी, अजिंक्य बोरकर आदींच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जाऊन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेतली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना कोडवाडा विभागाचे हजेरी रजिस्टर व इतर नोंदवह्या घेऊन बोलावले. या हजेरी रजिस्टरची पाहणी केली असता कोंडवाडा विभागात १२ कंत्राटी कामगार तर २-३ महापालिकेचे कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नगरमध्ये आली होती त्या काळात कोंडवाडा विभागामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम ६ दिवस राबवून ४० जनावरे पकडली गेली. त्यावर तब्बल ३ लाख रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. हा प्रकार आयुक्तांच्या समोरच उघडकीस आल्याने यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली.

यावेळी या प्रकाराची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले. तसेच यापुढे दररोज मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येईल व जनावरे पकडून त्यांची मालकांवर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचे आदेशही यावेळी आयुक्तांनी दिले. शहरासह उपनगर भागातही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेने कुठलीही पुर्व तयारी न करता माळीवाडा येथील कचरा रॅम्प अचानक बंद केल्याने शहरात कचर्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला असून नवरात्रोत्सव सुरु होण्यापुर्वी दोन दिवसात कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post