आचारसंहिता लागताच सी-व्हीजिल अँपवर तक्रारींचा पाऊस ; प्रशासनाकडून तात्काळ कारवाई
माय नगर वेब टीम
अहमदनगर - केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी केली आहे. ही निवडणूक आदर्श पद्धतीने पार पाडण्यासाठी व आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाची मदत घेत नागरिकांच्या तक्रारी व समाधानासाठी सी-व्हीजिल ॲप विकसित केले आहे. या ॲपवर काल एका तक्रारदाराने तक्रार दाखल करताच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर अवघ्या तीस मिनिटात कारवाई केली.
शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल भारत निवडणूक आयोगाच्या वतीने वाजविण्यात आला. शनिवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असून २७ सप्टेंबर रोजी आधिसुचना जारी होणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. लोकसभेचे प्रमाणेच विधानसभा निवडणूक प्रक्रियेतही आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शी, निष्पक्ष वातावरणात संपन्न होण्यासाठी आणि निवडणूक काळात गैरप्रकारांना घालण्यासाठी आयोगाने तीन ॲप्स विकसित केले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी सी-व्हीजील ॲप उपलब्ध केले गेले आहे. आचारसंहिता जारी झाल्यापासून दुसर्या दिवशी दुपारपर्यंत सी-व्हीजिल ॲप एकूण २६ तक्रारींची नोंद झाली आहे. यातील पाच तक्रारी निरर्थक असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकांच्या निदर्शनास आलेल्या वीस तक्रारींबाबत कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित एक तक्रार काल रविवार रोजी सी-व्हीजील ॲपवर तक्रारदाराने नोंदवली. कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर हद्दीतील संजीवनी शुगर फॅक्टरी येथे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह एका ठिकाणी लावण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही तक्रार सी-व्हीजिलवर दाखल होताच, त्याची निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. कोपरगाव तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी तक्रारदाराने सूचित केलेल्या ठिकाणी असलेले भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह आच्छादित केले. अर्ध्या तासाच्या आत सी-व्हीजिलवर दाखल झालेल्या तक्रारीचा निपटारा करण्यात आला.

Post a Comment