पारनेर सैनिक बँकेत लाखोंचा अपहार!



तपासणीसाठी संचालकांचे तहसीलदारांना पत्र

माय नगर वेब टीम

पारनेर - पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत वृद्ध, अपंग, निराधार यांच्यासाठी असलेल्या योजनेच्या निधीत गैरव्यवहार झाला आहे. मयत लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढण्यात आल्या असल्याची तक्रार एका सभासदाने सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे करण्यात आली आहे.

बँकेचे संचालक सुदाम कोथिंबीरे, बबनराव सालके, संतोष यादव,बापू दरेकर यांच्यासह शाखाधिकारी सदाशिव फरांदे व क्लार्क दीपक अनारसे यांनी परस्पर मयत लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कमेची विल्हेवाट लावली आहे. याबाबत तहसीलदार यांनी तपासणी करावी व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, असे निवेदन बँकेचे जागृत सभासद विनायक द्रोणागिरी गोस्वामी यांनी आयुक्तांसह कर्जत पोलीस ठाणे यांना दिले आहे. तसेच "आपले सरकार " या पोर्टलवर तक्रार करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे , संचालक श्रीकांत तोरडमल यांच्या संगनमताने शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांदे, लिपिक दीपक अनारसे, अनिल मापारी, रमेश मिसाळ यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निराधार वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेतील मयत लाभार्थी यांच्या नावावर आलेली रक्कम शाखाअधिकारी सदाशिव फरांदे व दीपक आनरसे यांचे नातेवाईक असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा करून ती रक्कम काढण्यात आली आहे.

दरम्यान कर्जत शाखेत बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे व मुख्य कार्यकारी आधिकारी संजय कोरडे यांच्या हितसंबंधामूळे फरांदे व अनारसे गेली १० वर्ष कर्जत शाखेत कार्यरत असल्याने यांनी बँकेत मनमानी कारभार करत अनेक ठिकाणी गैरकारभार केल्याचा आरोप बॅंकेतील माजी संचालक व खातेदारांनी केला आहे. तसेच शिवाजी व्यवहारे, संजय कोरडे यांच्यावरही शिरूर, पारनेर पोलीस स्टेशनमध्ये अपहार, गैर व्यवहाराचे गुन्हे दाखल असल्याने बँकेचे सभासद गोस्वामी व इतरांनी व्यवहारे, कोरडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अपहार दडपवण्यासाठी लिपीक निलंबित!
योजनांतील अपहारप्रकरणी कोरडे, व्यवहारे फरांदे यांनी स्वतः ला वाचवण्यासाठी क्लार्क अनारसे याला निलंबित केले आहे. संचालक मंडळाकडे अनारसे याच्या बाबत तोंडी तक्रारी आल्याने मागील दोन महिन्यांपूर्वी अनारसे यांची बदली श्रीगोंदा येथे केली होती. मात्र श्रीगोंदा येथे बदली असतानाही कोरडे, व्यवहारे, फरांदे यांनी निराधार योजनेतील मासिक रक्कम जमा करण्यासाठी अनारसे याला कर्जत येथे बोलवून रक्कम जमा केली जात असे. यात व्यवहारे, कोरडे यांचा हितसंबंध दडल्याचा आरोप तक्रारदार सभासद विनायक गोस्वामी यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post