'लोखंडी पुलाशेजारील नविन पुल १५ ऑगस्टपर्यंत खुला करा'
अधिकार्यांना व ठेकेदारास महापौरांच्या सुचना
माय नगर वेब टीम
अहमदनगर-
रेल्वेस्टेशन रोडवरील लोखंडी पुलाशेजारील नविन पुलाचे काम पूर्ण झालेले असून किरकोळ कामे तातडीने मार्गी लावत सदर पुल १५ ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिकार्यांना व या कामाच्या ठेकेदारास दिल्या आहेत.
रेल्वेस्टेशन रोडवरील लोखंडी पुला शेजारील नविन पुलाचे काम पूर्णत्वाकडे असून पुलाच्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, महिला व बाल कल्याण समिती सभापती लताताई शेळके, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, ठेकेदार रसिक कोठारी, अर्चना कुलट, बापू कुलट आदी उपस्थित होते. लोखंडी पुला शेजारी नविन पुलाचे काम नागरी दलित वस्तीत योजनेच्या निधीतून करण्यात आले आहे. निधीअभावी हे काम संथ गतीने सुरू होते. ७ महिन्यापूर्वी पुलाच्या कामासाठी दोन कोटी रूपये उपलब्ध झाले. त्यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सदर कामाची पाहणी करून संबंधीत ठेकेदार यांना कामास गती देवून पुलाचे काम फेब्रुवारी 2019 अखेर पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. कामास गती न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापौर वाकळे यांनी त्यावेळी दिला होता. त्यानंतर या कामाला गती मिळाली.पुलावरील स्लॅब तसेच सक्कर चौकाच्या बाजूने पुलाचे रिटानिंग वॉलचे काम करून भराव टाकणे स्टेशन रोडच्या साईटने पुलाकडून अप्रोच रोड करणे ही कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून पुल १५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला करा अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिकार्यांना व या कामाच्या ठेकेदारास दिल्या आहेत.
Post a Comment