काम थांबवू नका - महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अधिकारी ठेकेदारास सूचना
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
महापालिकेचे प्रोफेसर कॉलनी येथील नाटयगृहाच्या कामासाठी कुठलीही अडचण आल्यास तातडीने आपणाशी संपर्क साधावा, कुठल्याही परिस्थितीत काम थांबणार नाही याची काळजी घेत जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिकारी व ठेकेदाराला दिले आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रोफेसर कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या नाटयगृहाच्या कामाची पाहणी (शनिवारी दि.३) सकाळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, नगरसेविका सौ.सोनाबाई शिंदे, नगरसेवक मनोज दुलम, रविंद्र बारस्कर, उदय कराळे, सतिष शिंदे, पुष्कर कुलकर्णी, अमोल वाकळे, निलेश जाधव, शिया आढाव, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, नाट्य परिषदेचे अमोल खोले, ठेकेदार रसिक कोठारी, आर्किटेक्ट मनोज जाधव, शाखा अभियंता मनोज पारखे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, किशोर कानडे, शशिकांत देवकर, सोनु चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले की, नाट्यगृह हे नगर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वास्तु असुन ती वास्तु पुर्ण होण्यासाठी नाटयकलावंत नेहमी माझ्याकडे पाठपुरावा करीत असतात परंतु गेल्या ४ वर्षांपासून अत्यंत संथगतीने नाटयगृहाचे काम चालू आहे. ठेकेदार व आर्किटेक्ट यांनी समन्वय साधुन नाटयगृहाचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे कामामध्ये खंड पडुन काम बंद होते. मी पदभार स्विकारल्यानंतर तात्काळ नाटयगृहाच्या कामाची पाहणी करुन सदरील काम जलदगतीने कसे होईल याकडे मी प्राधान्याने लक्ष दिले. नाटयगृहामधील शौचालय व वॉशरुमचे काम येत्या एक महिन्यामध्ये पुर्ण करण्यात यावे व नाटयगृहाचे मोठे कॉलम व स्लॅबची डिझाईन आर्किटेक्ट यांच्याकडुन ४ दिवसामध्ये घेउन त्याप्रमाणे काम सुरु करण्यात यावे. या कामाकरीता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही व सदरील काम चांगल्या दर्जाचे करणेबाबत संबंधित ठेकेदार यांना सुचना दिल्या.
यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे म्हणाल्या की, नाटयगृहाचे काम सन २०२० पर्यंत पुर्ण करुन नाट्यकलावंतांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी मनपाचे एक हक्काचे व्यासपीठ उभे करण्यात यावे. दिवसेंदिवस नगर शहरामध्ये नाटय कलावंतांची संख्या वाढत असुन कलाकार चांगल्या दर्जाच्या नाटकांची निर्मीती करीत आहे. त्यामुळे नगर शहराचे नाव नाटयकला क्षेत्रात उंचावत आहे.त्यामुळे हे नाट्य गृह तातडीने होणे आवश्यक आहे.
Post a Comment