गमी फिंगरप्रिंट वापरणाऱ्या आधार केंद्र चालकांवर तहसीलकडून धडक कारवाई ; थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश





माय नगर वेब टीम

अहमदनगर -

गमी फिंगरप्रिंट वापरणाऱ्या आधार केंद्र चालकांवर नगर तहसीलकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. डुप्लिकेट गमी फिंगर प्रिंट वापरणाऱयांकडून गमी फिंगर प्रिंट जप्त करण्यात आले असून त्या आधार केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाई मुळे आधार केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

काय असते ही गमी फिंगर? आधार केंद्र चालकांनी डुप्लिकेट फिंगरप्रिंट बनवून आधार केंद्र चालवण्याचा अवैध प्रकार बऱ्याच ठिकाणी चालू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे प्राप्त होत्या. त्या अनुषंगाने आज आधार केंद्रांवर कारवाई करण्यात आली. आधार केंद्रांवर झालेल्या तपासणीत झडती घेऊन गमी फिंगरप्रिंट जप्त करण्यात आल्या आणि त्या आधार केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बायोमेट्रिक माहितीचा अशाप्रकारे दुरुपयोग करणे हे नीतिमत्तेला धरून नाही असे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले.

सदर प्रकरणी राज एंटरप्राइजेस सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, टीव्ही सेंटर आकाशवाणी चौक, सावेडी अहमदनगर येथील आधार केंद्रावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर किट जहीर उद्दीन सर्फुद्दिन शेख यांच्या नावे रजिस्टर्ड आहे. त्याचप्रमाणे सावेडी येथील इरफान गोल्डन टच या महा ई सेवा केंद्रावर सुद्धा कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाहीत तहसीलदार नगर उमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार बारवकर रावसाहेब, सावेडी मंडलाधिकारी दशा भाऊसाहेब, तलाठी देशपांडे भाऊसाहेब यांनी सहभाग घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post