काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन




माय नगर वेब टीम
पणजी - गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी करुन भाजप सरकार भक्कम करण्याच्या झालेल्या हालचालींमुळे गोवा पुन्हा एकदा चर्चेत आले. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना ठरली आहे.

काँग्रेसचे पंधरापैकी दहा आमदार फुटून भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे हे सर्व पक्षांतरबंदी कायद्यातून बचावणार असल्याचे मानले जात आहे. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळणकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तेवढे काँग्रेसमध्ये राहिले आहेत.

नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रिपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपाने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचा गट फुटण्यास गेल्या महिन्यात तयार झाला होता पण भाजपच्या स्तरावरुन निर्णय झाला नव्हता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post