' त्या ' भेटीनंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तर्कवितर्क




माय नगर वेब टीम

नवी दिल्ली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दोन महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. देशामध्ये जी सध्या परिस्थिती आहे त्याला निवडणुकीतून नव्हे, तर आंदोलनातून उत्तर देण्याची गरज असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी चर्चेत मांडली.

यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी करण्यासाठी राज ठाकरे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीला

दिल्लीत गेले होते. याच दौऱ्यात राज ठाकरेंनी सोनिया गांधींची 10, जनपथ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या कोणत्या नेत्याशी चर्चा करावी, हा प्रश्न राज ठाकरेंनी निकालात काढल्याचं दिसलं. थेट काँग्रेस हायकमांडशी राज ठाकरेंनी चर्चा केल्यामुळे या भेटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या वाटाघाटी झाल्या, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधी प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसची मदतच केली होती. मात्र राष्ट्रवादी अनुकूल असतानाही काँग्रेसने मनसेला सोबत घेणं टाळलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत झाली होती. त्यामुळे आता तरी काँग्रेस राज ठाकरेंना टाळी देणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.


काँग्रेस शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र, या तत्त्वाला अनुसरुन आता काँग्रेस मनसेची साथ घेणार का, याबाबत राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या करिष्म्याचा फायदा काँग्रेस करुन घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post