माय नगर वेब टीम
मुंबई - टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे. आयसीसीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

१९ वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.
राहुल द्रविड याआधी भारताच्या १९ वर्षाखाली क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. मात्र राहुल द्रविडला मिळालेल्या पदोन्नतीमुळे पारस म्हांब्रे आणि अभय शर्मा यांच्याकडे १९ वर्षाखाली क्रिकेट संघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडू हे वैद्यकीय सल्ल्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येत असतात. इथे प्रशिक्षित डॉक्टर आणि फिजीओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी होती. या सर्व प्रक्रियेवर राहुल द्रविडची नजर असणार आहे. यासंदर्भात भारतीय संघ व्यवस्थापनाला द्रविड आपला अहवाल सोपवणार आहे.
Post a Comment