
माय नगर वेब टीम
नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले. चव्हाण नागपुरात सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ सोनिया गांधी यांची नवी दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांचे विधान महत्त्वाचे ठरते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण, आता मत परिवर्तन झाले आहे. गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असेही चव्हाण म्हणाले.
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देशातील इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू आहे. पण सर्व काही लवकरच सुरळीत होईल. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू असून उमेदावारीसाठी अनेक इच्छुक आहे. पक्ष सर्व ताकदीनिशी निवडणूक लढेल.
Post a Comment