पिचडांचा रामराम, जगतापांचा कधी?
माय नगर वेब टीम
अहमदनगर – अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांचा भाजप प्रवेशाचा मुर्हूत ठरला आहे. आता नगरचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंद्याचे राहुल जगताप यांचा कधी? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान राज्यात सर्व पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. नगर शहरात संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असल्याचा दावा जगताप समर्थकांनी केला आहे.
आमदार संग्राम जगताप शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरूवातीला नगरच्या पटलावर सुरू होती, काल मात्र या चर्चेने टर्न घेत भाजप प्रवेशाची आवई उठविली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांच्या निवासस्थानी आमदार जगताप यांनी दिलेल्या भेटीचा फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जगताप हे भाजप प्रवेश करतील अशी अटकल बांधली जाऊ लागली. त्यातूनच आमदार जगताप यांचा भाजप प्रवेश कधी? असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे.
श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे अगोदरच भाजपमध्ये असल्याने त्यांच्यामुळेच जगताप यांचा प्रवेश अडल्याची चर्चा आहे. अकोल्यात आज माजी मंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या उपस्थितीत पिचड समर्थकांचा मेळावा सुरू आहे. मेळाव्यात उपस्थित अनेकांनी आपल्या भाषणातून आमदार वैभवराव पिचडांच्या भाजपा प्रवेशास अनुकूलता दर्शविली आहे. अकोले तालुक्याच्या विकासासाठी आमदार पिचडांनी घेतलेल्या निर्णयाला हा सर्वसंमतीने पाठिंबा मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. आमदार पिचड यांच्या भाजप प्रवेशाला अकोले तालुक्यातील जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे या मेळाव्यातून समोर आले आहे.
युतीच्या जागा वाटपात नगर शहराची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे जगताप हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती, पण ते भाजपात गेल्यास शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या उमेदवारीचं काय? याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे. नगरच्या जागेवरून युतीत ओढताण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Post a Comment