माय नगर वेब टीम
अहमदनगर - निवडणुकीच्या प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर करीत त्या ठिकाणी केलेली भाषणबाजी माजी पोलिस उपअधीक्षकासह नवनिर्वाचित सरपंचाच्या चांगलीच अंगलट आली आहे. या दोघांसह एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पॅनलचा प्रचार प्रमुख अशा चौघाजणांवर एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नगर तालुक्यातील मजले चिंचोली गावात हा प्रकार घडला असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निवृत्त पोलिस उपअधीक्षक यादवराव रभाजी आव्हाड, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अनिल उर्फ महेश पांडुरंग आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आनंदा आव्हाड, त्यांच्या पॅनलचे प्रचार प्रमुख किसन सावळेराम आव्हाड यांचा समावेश आहे. यांच्या विरोधात गावातील अविनाश भानुदास आव्हाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत त्यांनी म्हंटले होते की, मजले चिंचोली ग्रामपंचायतीच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विरभद्र जनसेवा पॅनल चे सरपंच पदाचे उमेदवार अनिल उर्फ महेश पांडुरंग आव्हाड व प्रभाग क्र.२ चे सदस्य पदासाठीचे उमेदवार धर्मनाथ आनंदा आव्हाड यांनी व इतरांनी दि. १४ जून रोजी गावातील जुने वीरभद्र मंदिर, मारुती मंदिर या धार्मिक परिसरात प्रचार सभा घेवून आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी पोलीसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत पत्र दिले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर व्यक्तींनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल एम.आय.डी.सी पोलीसांनी तहसीलदारांना सादर केला. त्यावरून निवडणुक निर्णय अधिकारी तथा नगर पंचायत समितीचे कृषी अधिकारी माधव देशमुख यांनी एम.आय.डी.सी पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले. त्यानुसार पोलिस नाईक मच्छिंद्र पाराजी पांढरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवृत्त पोलिस उपअधीक्षक यादवराव रभाजी आव्हाड, विद्यमान नवनिर्वाचित सरपंच अनिल उर्फ महेश पांडुरंग आव्हाड, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आनंदा आव्हाड, त्यांच्या पॅनलचे प्रचार प्रमुख किसन सावळेराम आव्हाड यांच्या विरोधात एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment