अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी नितेश राणेंसह अठरा जणांना अटक




माय नगर वेब टीम

कणकवली – काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागत असल्यानं आंदोलन केले होते. मात्र यावेळी काँग्रेस आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आता नितेश राणे यांच्यासह अठरा जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली असून त्यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.



दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकेबाबत गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला अधिकृत माहिती देताना सांगितले की, “नितेश राणे यांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. गृह मंत्रालय या प्रकरणी चौकशी करेल.”

तत्पूर्वी, कणकवली पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 40-50 कार्यकर्त्यांवर आयपीसीच्या कलम 353, 342, 332, 324, 323, 120 (ए), 147, 143, 504, 506 अंतर्गत एफआयआर दाखल केली.
आमदार नितेश राणे यांचे वडील राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ‘नितेश यांचं हे वागणं अत्यंत चुकीचं आहे. महामार्गाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणं योग्य आहे, पण त्याच्या समर्थकांनी अशा प्रकारे हिंसा करणं चुकीचं आहे. मी याला समर्थन देत नाही. मी त्याला माफी मागायला का सांगणार नाही, तो माझा मुलगा आहे. जर एखादा बाप स्वतःची चूक नसताना माफी मागू शकतो, तर मुलाला माफी मागावीच लागेल.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post