जलसंपदा मंत्री साहेब पुढाऱ्यांचे कारखाने चालविण्यासाठी गोरगरीब जनतेला उपाशी मारणार काय? - अभिनेत्री दीपाली सय्यद
माय नगर वेब टीम
अहमदनगर - पाणी शिल्लक नाही म्हणजे काय? मोठ मोठ्या पुढाऱ्यांचे कारखाने चालण्यासाठी तुम्ही दुष्काळी भागातील गोरगरीब जनतेला उपाशी मारणार काय? असा सवाल उपस्थित करत अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजनेसाठी पाणी शिल्लक नाही अशा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. दुष्काळी जनता उपाशी मरताना मला बघवत नाही त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी तुम्ही मला मरताना पहा असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे आयोजित जनजागृती सभेत अभिनेत्री सय्यद बोलत होत्या. नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी ठरणार्या 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजनेसाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि संवेदनशिल अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले यांनी जनआंदोलनाचे हत्यार उपसले असून क्रांतीदिनी (दि.९ ऑगस्ट) जिल्हापरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्याचे जाहीर केले आहे. या उपोषणाला मोठ्या जनआंदोलनाचे स्वरूप येवून राज्य सरकारवर दबाव येण्यासाठी त्यांनी शनिवार (दि.२०) पासून गावोगावी जनजागृती दौरा सुरु सुरु केला आहे. रविवारी (दि.२१) खडकी, सारोळा कासार, वडगाव तांदळी, गुणवडी, रुई छत्तीसी या गावात त्यांनी दौरा केला. सारोळा कासार येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भानुदास धामणे होते, यावेळी शिक्षकनेते संजय धामणे, शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कृषिराज टकले, 'साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब लंभाटे, नारायण रोडे, सुभाष गागरे, सूर्यभान कोतकर, राजेंद्र कडूस, सुभाष धामणे, संजय पाटील आदींसह कृती समितीचे सदस्य, विविध गावांमधील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिनेत्री दिपाली सय्यद - भोसले म्हणाल्या, 'साकळाई’ योजनेवर फक्त राजकारण सुरू आहे. निवडणुकीपुरती यावर चर्चा होते व त्यानंतर पुढे काहीच होत नाही. मुख्यमंत्री वाळकीच्या सभेत विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचे काम मार्गी लावण्याची ग्वाही देतात, तर दुसरीकडे यासाठी आता पाणी शिल्लक नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगतात. अशी परस्परविरोधी वक्तव्ये चुकीची आहेत. या योजनेसाठी राजकारण झाले असे नुसते म्हणून आता चालणार नाही. राजकारण हे राजकारणच असते, त्यामुळे आपल्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावेच लागणार आहे.
'साकळाई’ योजनेबाबत नुसत्या घोषणा ऐकून एक पिढी संपली आहे, मात्र आता राजकारण अजिबात होवू देणार नाही, पुढच्या पिढीला तरी हक्काचे पाणी मिळावे म्हणून हा लढा असून यामध्ये लाभार्थी गावातील शेतकरी, ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन करतानाच मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे, तुम्ही फक्त उपस्थित रहा असेही त्या म्हणाल्या.
'साकळाई’ उपसा जल सिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे म्हणाले, २७ जुलै पर्यंत गावोगावी जनजागृती सभा होणार आहेत, दिपाली ताईंचे उपोषण सुरु झाल्यावर १० अाॅगस्टपासुन ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलने सुरु होतील या आंदोलनांमध्ये राज्यातील वारकरी संप्रदायातील १०० कीर्तनकार रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी साकळाई’ योजनेचे कसे राजकारण केले हे सांगत आता या पुढाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आमच्या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
Post a Comment