माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, जिल्हा प्रशासानाने टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या उपाय योजनासाठी टॅंकरला मुदत वाढ दिली आहे. हा पाणी पुरवठा 1 ऑगस्ट पर्यंत सुरू ठेवण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या अत्यंत की राहिली. मागील दोन वर्षात जिल्हाभरात राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान आणि त्यानंतर गतवर्षीच्या हंगामात झालेला पुरेसा पाऊस यामुळे दुष्काळी गावांची संख्या घटली होती. परंतु यावर्षी 2018 मध्ये साधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले. जून अखेर जिल्ह्यात 873 टॅंकरद्वारे 603 गावे व 3 हजार 400 वाड्यावस्त्यासाठी पाणी पुरवठा करण्यात आला.
मागील चार दिवसापासून आभाळ भरून येत असताना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे तब्बल 805 टॅंकर धावत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या टॅंकरद्वारे जिल्ह्यातील 552 गावे व 3 हजार 268 वाड्यावस्त्यांवरील 14 लाख 11 हजार 530 नागरिकांची तहान भागविली जात आहे.
सध्या श्रीरामपूर, राहुरी वगळता अकोले, राहाता, नेवासे, संगमनेर, कोपरगाव, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदा या तेरा तालुक्यातील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टॅंकर हे पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. या तालुक्यात 100 टॅंकर, तर सर्वात कमी तीन टॅंकर हे राहुरी तालुक्यामध्ये सुरू आहेत. 2003 पासूनचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील जलस्तर कमालीचा घटला. त्यामुळे भर पावसाळ्याच्या दिवसात जिल्हा प्रशासनावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरु करण्याची वेळ आली. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. टॅंकरला ही मुदत वाढ देण्यात आली आहे.
तालुकानिहाय टॅंकर
पाथर्डी-100, पारनेर-117, जामखेड -59, कर्जत-87, श्रीगोंदे-72, नगर -70, शेवगाव-58, संगमनेर-76, नेवासे-61, अकोले-15, कोपरगाव-10, राहाता-10, राहुरी-4
पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी 15 जुलै पर्यंत मुदत वाढ
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या टंचाई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या तात्पूरत्या पाणी पुरवठायोजना व नळ पाणी पुरवठा योजनांची विषेश दुरुस्ती साठी प्राप्त झालेल्या निविदांना चालू दरानुसार 10 टक्के वाढीव दर देवून निविदा स्विकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असून हे अधिकार 15 जूलै पर्यंत आहेत. त्यामुळे टंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही.
Post a Comment